Donald Trumph India Tour : १०० कोटींचा खर्च करतय कोण ? कार्यक्रम खासगी कि सरकारी ? याचाही खुलासा नाही , प्रियांका गांधींचे प्रश्नचिन्ह

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नियोजित दौ-यानुसार २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भारतात दाखल होत आहेत. ट्रम्प यांच्या या दौऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदीही विशेष काळजी घेताना दिसत आहेत. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भेटीसाठी १०० कोटींहून अधिक खर्च करण्यात येणार आहे. पण हा खर्च करतंय कोण? असा प्रश्न काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नासोबतच निर्माण झालेल्या आपल्या काही शंका त्यांनी सोशल मीडियावरून विचारल्या आहेत.
प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे कि , ‘राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनावर १०० कोटींहून अधिक खर्च होतोय. हा पैसा एका समितीद्वारे खर्च करण्यात येतोय. परंतु, समितीच्या सदस्यांनाच माहीत नाही की ते या समितीचे सदस्य आहेत. कोणत्या मंत्रालयानं या समितीला किती पैसे दिले? हे जाणून घेण्याचा देशाला अधिकार नाही का, समितीला पुढे करून सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे’ असा प्रश्न प्रियंका गांधी सोशल मीडियावर विचारला आहे. यासंदर्भात एका वर्तमानपत्रानं छापलेल्या बातमीचा हवाला देत प्रियंका यांनी हा सवाल केलाय.
अहमदाबादच्या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमच्या उद्घाटन कार्यक्रमात २४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचं आयोजन ‘डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती’ करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय. या कार्यक्रमाचं आयोजन केंद्र सरकार करतंय की गुजरात राज्य सरकार की भाजप? असा सवाल विचारला जात होता. उल्लेखनीय म्हणजे, इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या ‘डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती’ची ना वेबसाईट आहे ना सोशल मीडियावर उपस्थिती… ही एक खासगी संस्था असल्याचं सांगण्यात येतंय. मग प्रश्न उपस्थित होतो की, खासगी संस्थेच्या कार्यक्रमाला सरकार का खर्च करत आहे? गुजरातचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमासाठी खास मेहनत घेत आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, सरकारनं खासगी संस्थेच्या या खास सोहळ्यासाठी गुजरात सरकारच्या ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स ऍन्ड टेक्नोलॉजी’नं namastepresidenttrump.in ही वेबसाईटही बनवलीय. या वेबसाईटवरही समितीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ‘डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती’चे अध्यक्ष किंवा सदस्यांच्या नावाचाही अद्याप पत्ता नाही. याबद्दल कोणतीही माहिती सरकारनं दिलेली नाही. अहमदाबाद पश्चिमचे खासदार डॉ. किरीट सोलंकी या समितीचे सदस्य असल्याचं सांगण्यात येतंय. परंतु, विशेष म्हणजे खुद्द सोलंकी यांनाही शुक्रवारी सकाळीच याबद्दल फोनवरून माहिती मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रियंका गांधी यांनी केलेल्या ट्विटनंतर आता हा मुद्दा चर्चेत येणार, हे साहजिकच आहे. मात्र सरकारच्या वतीने याची उत्तरे दिली जातील असे म्हणता येणार नाही.