हरिपाठाचे पाठांतर केले नाही , विद्यार्थ्याला बेदम मारहाण , महाराज शिक्षक फरार

हरिपाठाचे पाठांतर झाले नाही म्हणून संतप्त झालेल्या एका महाराजांच्या आळंदीमध्ये ७ वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचे वृत्त आहे. या महाराजाने या मुलाला इतकी बेदम मारहाण केली की गेल्या चार दिवसांपासून तो शुद्धीवर आलेला नव्हता शुद्धीवर आल्यानंतर मुलाने पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यावर हा प्रकार समोर आला. दरम्यान मारहाण करणारा हा महाराज सध्या फरार असून आधी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलसांनी अखेर या प्रकरणात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भगवान पोव्हणे असे या फरार झालेल्या महाराजांचे नाव आहे.
याविषयीची अधिक माहिती अशी कि , पीडित विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून आळंदीच्या माऊली ज्ञानराज कृपा प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्था या आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेतो आहे. काही दिवसांपूर्वी या शाळेतील महाराज भगवान पोव्हाणे याने सर्व विद्यार्थ्यांना हरी पाठाचे पाठांतर करुन येण्यास सांगितले होते. मात्र विद्यार्थ्याने हरी पाठाचे पाठांतर केले नाही. त्यामुळे महाराज भगवान पोव्हाणे याने मुलाला लाकडी काठीने बेदम मारहाण केली. ही मारहाण लपवण्यासाठी तो पीडित विद्यार्थ्याला घेऊन महाराज औरंगाबादला गेला. त्या ठिकाणी विद्यार्थी बेशुद्ध पडला. यानंतर मुलगा आजारी असल्याची खोटी थाप मारत त्या विद्यार्थ्याला पालकांच्या स्वाधीन केलं. या मारहाणीत त्या विद्यार्थ्याची शुद्ध हरपल्याने पालकांनी त्याला तळेगाव दाभाडे येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पण आनंद हॉस्पिटलमध्ये त्या मुलाची तब्येत अजून खालावली. तब्बल चार दिवसांनी पीडित मुलगा शुद्धीवर आल्यानंतर त्याने पालकांना सर्व प्रकार सांगितला.
त्यानंतर पालकांनी तात्काळ आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यावेळी भगवान महाराज पोव्हाणे याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याची विनंती केली. मात्र आळंदी पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. सध्या पीडित मुलावर पिंपरी येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर यामिनी आडबे यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत पुढाकार घेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना या संपूर्ण गंभीर घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली.
अद्याप या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आश्रम शाळेतील महाराजाला ताब्यात घेतलेले नाही. कलम ३०७ प्रमाणे आरोपी महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी महाराज सध्या पसार आहे. या मारहाणीनंतर मुलाची प्रकृती ७ दिवस गंभीर होती. अध्यात्मिक शिक्षणात असलेला अभ्यास पूर्ण न केल्याने भगवान पोव्हणे महाराजाने विद्यार्थ्याला काठीनं बेदम मारहाण केली. डोके छाती आणि पोट आदी अवयवांवर जबरदस्त मार लागल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला.