चर्चेतली बातमी : अखेर इंदोरीकर महाराजांनी आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवला आपला खुलासा…

आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आडचणीत आलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी त्यांच्यावरील आरोपांबाबत आपल्या वकिलामार्फत खुलासा पाठवला असल्याचे वृत्त आहे. ” सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते” , या सम-विषमच्या फॉर्म्युलावरून कीर्तनकार इंदोरीकर यांनी आपला हा खुलासा पाठविला आहे. अहमदनगरचे नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रवीण मुरंबीकर यांनी पीसीपीएनडीटी कायद्यानुसार त्यांच्यावर लिंग भेदभाव केल्याची नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये त्यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. अखेर दिलेल्या कालवधीच्या शेवटच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत आरोग्य विभागाला स्पष्टीकरण दिले आहे.
निवृत्ती महाराज इंदोरीकरांचे वकील अॅड. शिवलीकर यांनी काल बुधवारी दुपारी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात जाऊन इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर स्पष्टीकरण दिले. मात्र या खुलाशात इंदोरीकरांनी नेमकी काय भूमिका घेतली आणि काय स्पष्टीकरण दिले, ते समजू शकले नाही. विशेष म्हणजे अॅड शिवलीकर यांनी यावेळी माध्यमांपासून लांब राहणे पसंत केले. अॅड. शिवलीकर आपलं स्पष्टीकरण देऊन कोणालाही न बोलता निघून गेले. दुसरीकडे, या संदर्भात माहिती देण्यास जिल्हा रुग्णालयानेही नकार दिला. दरम्यान, पुढील दोन दिवसानंतर इंदोरीकर आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर अनेक सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे. दुसरीकडे नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रवीण मुरंबीकर यांनी महाराजांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास सांगितले होते. या नोटिशीचा खुलासा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आज सुट्टी असल्यामुळे खुलासा येतो की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर इंदोरीकर महाराजांचे वकील अॅड. शिवलीकर हे एका सेवकासमवेत आज दुपारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यांनी तेथील अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क केला, त्यावेळी त्यांना रुग्णालयात उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडे तुम्ही खुलासा सादर करा, असे सांगितले. त्यानंतर अपघात कक्ष विभागामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांकडे खुलासा सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराजांच्या वकिलांनी हा खुलासा दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची सही व शिक्का घेऊन दुसऱ्या दाराने निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना खुलाशाबाबत विचारणा केली. मात्र त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. दोन दिवसांमध्ये महाराज स्वतः भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.