सोलापूर : महिलेची विवस्त्र धिंड काढणाऱ्या ९ आरोपींना पाच वर्षाची सक्तमजुरी

सोलापूरातील तेलगाव सीना येथे एका दलित महिलेला विवस्त्र करुन धिंड काढण्यात आली होती. या गावात महिलांचा अनैतिक व्यवसाय सुरू आहे म्हणून पोलिसात निनावी तक्रार करण्याच्या संशयावरुन या दलित महिलेला गावातील ९ जणांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.के.अनभुले यांनी सर्व ९ आरोपींना पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. दंड घेतल्यानंतर ही रक्कम पीडित महिलेला देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
शिक्षा ठेवण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिवाजी लक्ष्मण पाटील (वय ४९), बिभीषण लक्ष्मण पाटील (वय ४७), गणपत नामदेव पाटील (वय ४३),.अरूण बंडा जाधव (वय ३५), कमलाकर शामराव पाटील (वय ४०), बाळासाहेब सिद्राम माने (वय ५५), नितीन कोंडिबा पाटील (वय ३०),पार्वतीबाई बाळू पाटील (वय ३०) आणि सुभाबाई दिगंबर घाटे (वय ५५) यांचा समावेश आहे.
सोलापूरजवळ असलेल्या तेलगाव सीना या गावातील काही महिला या अनैतिक व्यवसाय करीत असल्याने साधारण १४ वर्षांपूर्वी झालेल्या या प्रकरणात आरोपींनी अत्यंत क्रुर कृत्य केले होते. त्यांच्याविरोधात निनावी पोलीस तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार या पीडित महिलेने केली असावी असा संशय होता. या संशयातून आरोपींनी या दलित महिलेला मारहाण केली. यावेळी त्यांनी तिच्या लहान मुलालाही बेदम मारले. आरोपी इतकं करुन थांबले नाही तर त्यांनी गावाच्या चावडीसमोर तिला विवस्त्र अवस्थेत बसवले, त्यानंतर त्याच अवस्थेत तिची गावभर धिंड काढली. या प्रसंगानंतर महिला हादरली होती. तिने यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. मात्र सुरुवातील पोलीस तक्रार दाखल करुन घेत नव्हते. माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यावर पोलिसांनीही तक्रार दाखल करत पुढील कारवाई सुरू केली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. अनेक ठिकाणी आंदोलने झाली. आज तब्बल १४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या दलित महिलेला न्याय मिळाला आहे. या प्रकरणातील आरोपींना ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.