आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या वादात शरद पवारांनीही उडी …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगलेला असतानाच या वादात आता शरद पवारांनीही उडी घेतली आहे. ‘हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या, असं आव्हान महाविकास आघाडीला देणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिआव्हान देताना म्हटलं आहे कि , ‘नुसत्या राज्यातच कशाला?, संपूर्ण देशात निवडणूक घ्या.’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जळगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान भाजपला दिलं होतं. त्यावर हिंमत असेल तर निवडणुका घ्या. जनता कोणाच्या बाजूनं आहे ते कळेल, असं फडणवीस म्हणाले होते. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी फडणवीसांच्या आव्हानाची खिल्ली उडवली. ‘फक्त महाराष्ट्रातच कशाला? लोकसभेचीही निवडणूक घ्या. होऊन जाऊ द्या,’ असं पवार म्हणाले.
दरम्यान एल्गार परिषद व कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासावरून सध्या राज्यात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. ‘राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. वेगवेगळ्या विषयांवर प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते. सगळ्याच विषयांवर सगळ्यांची मतं जुळतील असं नाही. मात्र, एकूण व्यवस्थित चाललं आहे,’ असं ते म्हणाले.