भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणात , शरद पवारांचा संभाजी भिडेंवर थेट आरोप , समांतर चौकशीची मागणी

‘भीमा -कोरेगाव येथील विजयी स्तंभाला अभिवादन कारण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमत असतात. अनेक वर्षांपासून हे होत आले आहे. तिथं बाहेरून येणाऱ्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये कधीही कटुता नव्हती. संभाजी भिडे यांनी मात्र तिथं वेगळं वातावरण निर्माण केलं,’ असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत केला.
पवार म्हणाले कि , कोरेगाव-भीमाच्या लढाईत काही भारतीय ब्रिटिशांच्या बाजूने लढले. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला हे वास्तव आहे. एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा या दोन वेगवेगळया घटना आहेत. एल्गार परिषदेत १०० पेक्षा जास्त संघटना सहभागी होत्या असे शरद पवार म्हणाले. “एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा यांचा संबंध नाही. त्यासंबंधीचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. एल्गार परिषदेत काही भाषणं केली गेली. १०० पेक्षा अधिक संघटनांचा सहभाग होता. अध्यक्षपद पी.बी सावंतांकडे होतं. पण ते न आल्यानं प्रकाश आंबेडकरांनी अध्यक्षपद भूषवलं. अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण, हजर नसलेल्या लोकांवर पोलिसांनी खटले भरले आणि आणि त्यांना तुरूंगात टाकलं,” असं आरोप पवार यांनी केला.
दरम्यान एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्र सरकारला देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं समांतर चौकशीची भूमिका घेतली आहे. त्यासाठी गृहखात्याच्या अखत्यारित स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काल झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी संपूर्ण प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य केलं.
मागील सरकारनं अधिकारांचा गैरवापर करून हे प्रकरण हाताळलं आणि काही पोलिसांनी त्यांना साथ दिली. त्याबद्दल आमची तक्रार असून पोलिसांच्या आक्षेपार्ह वर्तनाची चौकशी झालीच पाहिजे. तशी चौकशी झाल्यास सत्तेचा गैरवापर करणारे उघडे पडतील,’ असं पवार म्हणाले. ‘राज्य सरकारकडं आमचं म्हणणं आम्ही लेखी मांडलं आहे. आता सरकार काय करेल ते करेल. पण मागच्या सरकारनं जे केलं ते लोकांसमोर यायला हवं,’ अशी आमची भूमिका असल्याचं ते म्हणाले.
आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव तर नाही ना ? बाळासाहेब थोरात यांचा सवाल
दरम्यान पुण्यातील एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडं (एनआयए) देण्याचा केंद्राचा निर्णय काळजी वाढवणारा आहे. दलित व आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा हा डाव तर नाही ना,’ अशी भीती महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. थोरात यांनी एकप्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
‘महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या. एल्गारच्या निमित्तानं महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ संपवण्याचा डाव आहे का? संपूर्ण आंबेडकरी, दलित चळवळीलाच नक्षलवादी ठरवण्याचा डाव आहे का?, अशी चिंता वाटते. या प्रकरणाचा तपास एनआयएकडं देण्याची काळवेळ पाहिली तर संपूर्ण समाज, राज्य आणि देश या प्रकरणाकंड संशयानं पाहतोय’, असंही त्यांनी सांगितलं.