Aurangabad News Update : पक्षातील गद्दारांबाबत काय म्हणाले राज ठाकरे आणि कोण आहेत “ते” दोन गद्दार ?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्याच कार्यकर्त्यांवर तोफ डागताना “आपल्याच पक्षात काही लोक गद्दार आहेत जे मीडियामध्ये चुकीच्या बातम्या देतात. या गद्दारांची नावं मला कळली असून त्यांची मी पक्षातून हकालपट्टी करणार आहे. ” राज यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत . सध्या राज ठाकरे आणि मनसे पक्षाच्या उभारणीसाठी मैदानात उतरले असून औरंगाबादच्या दौऱ्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्याच गद्दार कार्यकर्त्यांची झाडाझडती घेतली.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज म्हणाले कि , ‘मी पक्षाच्या बैठकीसाठी आलो आहे. कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. आपल्याला जोरात काम करायचं आहे. पण काही लोक चुकीच्या बातम्या देतात. आपलेच कार्यकर्ते गद्दार आहेत. त्यांची नावं मला समजली असून मी त्यांना पक्षातून हद्दपार करणार’ असल्याचं राज ठाकरे म्हणाले. ‘गद्दारपणा करणाऱ्यांना पक्षात जागा नाही त्यांची हकालपट्टी मी करणार आहे. दोन दिवसात त्यांना पक्षातून हकालणार आहे’ अशा थेट इशारा राज ठाकरे यांनी देऊन टाकला.
राज पुढे म्हणाले कि , ‘बांगलादेशी घुसखोरांसाठी मी आंदोलन केलं. मात्र आता अफगाणी घुसखोर सापडले आहेत. परिस्थिती गंभीर आहे. मी १५ दिवसांनी पुन्हा येईन तेव्हा सविस्तर बोलेल. आता मला जाण्याची रजा द्यावी’ असं राज ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि मनसेविरोधात चुकीच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवल्या जात आहेत. राज ठाकरे कुठे जाणार आणि कुठे सभा घेणार याबद्दल त्यांनाही माहिती नसताना नको त्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. चुकीच्या बातम्यांमुळे राज ठाकरे चांगलेच चिडले होते. बैठकीत बोलतानाच ते म्हणाले कि , काही गद्दार लोक आहेत. गद्दारांनी माझ्या सभेतूनदेखील बाहेर जावं. दरम्यान, पुढच्या दोन दिवसांमध्ये मी या गद्दार लोकांची नावं समोर आणून त्यांना पक्षातून काढून टाकेन असं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे हा गद्दारीपणा कोणी केला ? याकडे सर्वांचं लक्ष आहे.