चर्चेतली बातमी : इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणाले कि , ते अडचणीत आले ….

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज देशमुख हे सध्या आपल्या एका किर्तनातील वक्तव्यातून अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य पीसीपीएनडिटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्या नुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली आहे. गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम २२ चं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडून इंदुरीकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’ या वक्तव्याने हभप इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आणि पुढे चालून गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांचा कारावासाची या शिक्षेत तरतूद आहे.
इंदुरीकरांच्या किर्तनाचा व्हिडिओ ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला होता. यामध्ये ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात, असं विधान इंदुरीकर यांनी केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसलं होतं. हे विधान करताना इंदुरीकर महाराजांनी थेट पीसीपीएनडीटी कायद्याचेच उल्लंघन केल्याचं उघडकीस आलंय.
दरम्यान पीसीपीएनडिटी च्या सल्लागार समितीने प्रसारित व्हिडीओ, वृत्तपत्रातील बातम्या यावर आता हभप इंदोरीकर महाराजांना नोटीस पासून खुलासा मागवला आहे. आता इंदोरीकर महाराज या गोष्टीला कसा प्रतिवाद करणार की एखाद्या कीर्तनातून आपल्या मिश्किल शैलीत समाचार घेणार ये येणाऱ्या काळात पुढे येणार आहे.
या प्रकरणावर बोलताना आरोग्य विभागाच्या राज्य समूचित प्राधिकारी आणि अतिरिक्त संचालक अर्चना पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो हे विधान पीसीपीएनडीटी कायद्याचं उल्लंघन आहे. आम्ही इंदुरीकर महाराजांचा संबंधित व्हिडीओ तपासून त्यांच्या वक्तव्यांची खातरजमा करु. जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या सुचना दिल्या जातील.” अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा समुचित अधिकारी प्रदीप मुरंबीकर म्हणाले, “सल्लागार समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यात संबंधित वक्तव्य करुन पीसीपीएनडीटी कायद्याचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”