ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातखोरांना आता ५० लाखापर्यंत दंड आणि पाच वर्षाची शिक्षा करण्याचा प्रस्ताव

आपल्या भडक जाहिरातीद्वारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या सौंदर्यवस्तू उत्पादकांना आवर घालण्यासाठी आता त्वचा उजळणे, उंची वाढणे, केसांची वाढ होणे यासह शरीरसंबंधाबाबत दावे करणाऱ्या आक्षेपार्ह जाहिराती केल्यास आता ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता आहे. औषधे आणि जादूचे उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) या कायद्याअंतर्गत बदल करण्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने प्रस्तावित केले आहे.
यासंदर्भात औषधे आणि जादूचे उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) १९५४ च्या कायद्यामध्ये जवळपास ५४ आजार नमूद केले असून यासंबंधी आक्षेपार्ह जाहिरात केल्यास शिक्षा होईल असे नमूद केले आहे. मात्र यात शिक्षेचे स्वरूप दिलेले नव्हते मात्र दिवसेंदिवस विविध आजारांवरील औषधांच्या आकर्षक जाहिराती दाखवत फसवणूक करण्याचे किंवा याला बळी पडण्याचे प्रकार घडत आहेत. तेव्हा याला आळा घालण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी मसुदा प्रस्तावित केला असून सूचना आणि हरकतींसाठी खुला केला आहे.
या कायद्यानुसार आक्षेपार्ह जाहिरात प्रदर्शित केल्या कारणास्तव पहिल्यांदा दोषी आढळल्यास २ वर्षांपर्यंत कारागृहाची शिक्षा तसेच दहा लाख रुपयांचा दंड होईल. वारंवार दोषी आढळल्यास पाच वर्षांपर्यंत कारागृहाची शिक्षा आणि ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल असे या मसुद्यात नमूद केले आहे. जुन्या कायद्यात नमूद असलेल्या आजारांच्या यादीमध्येही काही बदल केलेले आहे. त्वचा उजळणे, एड्स, केसांचा रंग बदलणे, केसांची वाढ होणे, हत्तीरोग, आनुवंशिक आजार, मेंदूची शक्ती वाढविणे, स्मरणशक्ती वाढविणे, उंची वाढविणे, समागमामध्ये अधिक आनंद मिळवून देणे, मानसिक आजारातून बरे करणे, मूत्रपिंडातील खडे आदींचा नव्याने समावेश केला आहे.