चर्चेतली बातमी : निर्भयाच्या खुन्यांच्या वकिलाने दिली हि धक्कादायक प्रतिक्रिया

कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी न्यायालयाकडून निर्भयाच्या खुन्यांना झालेली फाशी पुढे ढकलण्यात आल्याने निर्भयाच्या माता -पित्याने दिलेली प्रतिक्रिया आल्यानंतर या आरोपींचे वकीलपत्र घेतलेल्या वकील महाशयाने दिलेल्या धक्कादायक प्रतिक्रियेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे . त्यांनी म्हटले आहे कि , एका व्यक्तीचा बदला पूर्ण करण्यासाठी पाच खून व्हावेत, हे भारत सहन करणार नाही. निर्भया प्रकरणातील चारही आरोपींचे वकिल ए.पी.सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने चारही आरोपींच्या फाशीचा निर्णय आज राखून ठेवल्यानंतर ते म्हणाले कि , आरोपी मागच्या सात वर्षांपासून तुरुंगात आहेत. एका बाजुला त्यांच्या चार आई आहेत तर दुसऱ्या बाजुला निर्भयाची एक आई. आता तुम्हाला ठरवायचे आहे की, एका आईचे दुःख समजून घ्यायचे की चार आईंचे? अशाप्रकारचे धक्कादायक विधान ए.पी.सिंह यांनी केले आहे.
ए.पी.सिंह पुढे म्हणाले की, “सध्या दिल्ली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निर्भया प्रकरणाची मीडिया ट्रायल, राजकीय ट्रायल आणि जनतेच्या भावनांसोबत ट्रायल सुरु आहे. आरोपींना फाशी देण्याच्या घाईमुळे कुठेतरी अन्याय होत आहे.” पतियाळा कोर्टाने चारही आरोपींच्या फाशीला स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकार आणि तिहार तुरुंग प्रशासनाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. काल या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला.
डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीमध्ये धावत्या बसमध्ये सहा आरोपींनी निर्भयावर पाशवी बलात्कार करुन तिचा निर्घृण खून केला होता. सहा आरोपींपैकी अल्पवयीन आरोपीला सोडून देण्यात आले आहे. तर पाच आरोपींपैकी राम सिंहने तुरुंगातच आत्महत्या केली असून अक्षय ठाकूर, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांच्या फाशीचा निर्णय प्रलंबित आहे. निर्भयाच्या आईने या चारही आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी, अशी मागणी सातत्याने लावून धरली आहे.
ए.पी.सिंह पुढे म्हणाले की, लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणी आरीफ उर्फ अशफाक हा अजूनही तिहार तुरुंगात जिवंत आहे. त्याचे सर्व कायदेशीर मार्ग संपलेले आहेत. क्युरेटिव पेटिशन, दयेचा अर्ज नाकारण्यात आलेला आहे. मात्र दिल्ली सरकार आणि तिहाल तुरुंग प्रशासन त्याला फाशी देण्यासाठी प्रयत्न करत नाहीयेत. मात्र निर्भया प्रकरणात त्यांची तत्परता दिसत आहे.