भीमा कोरेगाव एल्गार परिषद चौकशी अयोग्य देवेंद्र फडणवीस यांनाही करणार पाचारण !! पुढील तीन दिवस सुनावणी..

बहुचर्चित भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरण केंद्राने एनआयए अर्थात राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीकडे सोपवल्यामुळे मोदी सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहे. आता या प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी होणार का याबद्दल चौकशी आयोगाने महत्त्वाचा खुलासा केला आहे. एल्गार परिषद प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवण्यात यावं, अशी मागणी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडे करण्यात आली होती. या प्रकरणी, देवेंद्र फडणवीस यांना योग्य वेळी बोलवण्यात येईल. न्याय आणि सत्यासाठी त्यांनी देखील सहकार्य करावे, असं स्पष्टीकरण भीमा कोरेगाव चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी दिलं.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची आजपासून साक्ष सुरू होणार असून पुढील तीन दिवस ही सुनावणी सुरू राहणार आहे. न्यायमूर्ती जे एन पटेल आयोगाचे अध्यक्ष आहेत. माहिती आयोगाचे अध्यक्ष सुमित मलिक हे सदस्य आहेत. जोगेंद्र कवाडे आणि पोलीस अधिकारी लखान यांची आयोगासमोर साक्ष होणार आहे. काही दिवसांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, भीमा कोरेगाव दंगलीच्या दिवशी जखमी झालेले ग्रामीण पोलीस अधिक्षक, त्या दिवशी बंदोबस्तासाठी नियुक्त एसीपी,पीआय, ठाणे अंमलदार यांना तत्काळ आदेश काढून भीमा-कोरेगाव दंगे चौकशी आयोगाच्या समोर साक्ष आणि उलट तपासणीसाठी बोलवावं असा अर्ज पक्षकार डॉ संजय लाखे पाटील यांनी केला होता.
दरम्यान, २७ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासाची कागदपत्रं ताब्यात घेण्यासाठी एनआयए राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी, एनआयएची टीम दिवसभर पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाली होती. पण रिकाम्या हातानेच या टीमला परतावे लागले होते. परंतु, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून परवानगी येत नाही. तोवर तपासाची कागदपत्र देता येणार नाहीत, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. अखेर रात्री उशिरा एनआयएची ही टीम रिकाम्या हाताने माघारी परतली. एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याच्या मु्द्दयावर राज्य सरकार सर्व कायदेशीर बाबींचा तपास करत आहे. तसेच यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तयारी सुरू आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.