निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : पावनच्या वडिलांची याचिका फेटाळली

दरम्यान, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवनच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका पाटियाला हाउस कोर्टच्या सेशन कोर्टाने फेटाळून लावली आहे. ६ जानेवारीला मेट्रोपोलिटियन मॅजिस्ट्रेटने पवनच्या वडिलांची याचिका फेटाळली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, या प्रकरणामध्ये एकमेव साक्षीदाराने माध्यमांकडून पैसे घेऊन साक्ष दिली होती. यामुळे त्याची साक्ष सत्य आहे म्हणता येणार नाही.
पवनशिवाय या प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंगनेसुद्धा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याविरोधात त्याने दाखल केलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं की, जेव्हा एखाद्याला फाशी देण्यात येणार असेल तर त्याला प्राधान्य देण्यापेक्षा दुसरं काही गरजेचं असू शकत नाही.
दिल्लीत २०१२ मध्ये निर्भयावर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर देश हादरला होता. नराधमांनी बलात्कार केल्यानंतर तिला रस्त्यावर फेकून दिलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी निर्भयाचा मृत्यू झाला. यातील दोषी मुकेश कुमारची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १७ जानेवारीला फेटाळून लावली होती.