गुजरात नंतर आरएसएसचे उत्तर प्रदेशावर लक्ष , सुरु करताहेत पहिली सैनिकी शाळा , जाणून घ्या काय आहे उद्धेश ?

गुजरात नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले लक्ष उत्तर प्रदेशाकडे वळविले आहे. प्रारंभी गुजरातला संघाच्या हिंदुत्ववादी विचाराची प्रयोग शाळा म्हणून पहिले जात होते परंतु संघाच्या विचाराचे खरे रूप दाखविण्यासाठी गुजरातपेक्षा उत्तर प्रदेश अधिक प्रभावी राहील असा विचार करून संघाने गेल्या काही महिनांपासून उत्तर प्रदेश या देशातील सर्वात मोठ्या राज्याला आपली कर्मभूमी बनविण्याच्या दृष्टीने कार्यरत असल्याची प्रचिती येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने आता उत्तर प्रदेशात आता लष्करी शाळा उघडण्याचा संकल्प सोडला आहे.
आदित्यनाथ योगी मुख्यमंत्री असलेल्या उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरात संघाची पहिली पहिली सैनिकी शाळायावर्षी एप्रिल महिन्यापासून सुरु होणार आहे. संघाच्यावतीने सांगण्यात येत आहे कि , या शाळेतील विद्यार्थ्यांना सैन्यदलात जाऊन लढण्याची प्रेरणा देण्यात येणार आहे. तसेच ही शाळा संस्कार, संस्कृती आणि समरसता या मूल्यांवर आधारीत असेल. तसेच आमचे ध्येय हे राष्ट्रभक्ती असून जर कुणी त्याला हिंदुत्वाशी जोडत असेल तर ती त्यांची समस्या आहे, असेही संघातर्फे सांगण्यात आले आहे. या शाळेचे नाव माजी सरसंघचालक राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया यांच्या नावाने रज्जू भैया सैनिक विद्या मंदिर (आरबीएसवीएम) ठेवण्यात आले आहे. या शाळेबद्दल माहिती देताना संघ पदाधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांनी सैन्यात जावे यासाठी आम्ही त्यांना संस्कार, संस्कृती आणि समरसतेवर आधारीत शिक्षण देणार आहोत. ज्यामुळे पुढील काळात आपली सेना आणखी बळकट होईल. विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणासोबतच नैतिक आणि अध्यात्मिक दिशा देण्याचेही काम आम्ही करणार आहोत.
संघाच्यावतीने असेही सांगण्यात येत आहे कि, या शाळेत कोणत्याही जातीवर आधारीत आरक्षण दिले जाणार नाही. मात्र युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या मुलांसाठी आठ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या मुलांना वयातही सूट दिली जाणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश काय असणार? हे देखील निश्चित करण्यात आले आहे. फिक्या निळ्या रंगाचा शर्ट आणि गडत निळ्या रंगाची पँट असा विद्यार्थ्यांचा तर शिक्षकांना पांढरा शर्ट आणि करड्या रंगाची पँट घालावी लागणार आहे. आरबीएसवीएम चे संचालक कर्नल शिव प्रताप सिंह म्हणाले की, आमचे विद्यार्थी एनडीए, नौसेना, तांत्रिक परिक्षा आणि लष्कारासाठी तयार केले जातील. २३ फेब्रुवारी पासून नोंदणी सुरु केली जाईल. १ मार्च रोजी प्रवेश परिक्षा घेतली जाईल. सांख्यिकी, सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांची परिक्षा घेऊन विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता तपासली जाईल. लेखी परिक्षेनंतर मुलाखत आणि आरोग्य चाचणी घेतल्यानंतर प्रवेश दिला जाणार आहे. शाळेचे पहिले सत्र ६ एप्रिल रोजी सुरु होणार आहे.