आमची मुंबई : आजपासून मुंबईत “नाईट लाईफ ” , मुंबई २४ तास …मुंबईकरांना मिळणार नवा अनुभव !!

राज्यशासनाच्या वतीने घोषित केल्यानुसार मुंबई महानगरात आजपासून प्रायोगिक तत्वावर “मुंबई २४ तास” ची इंनिंग सुरु होणार असल्याने मुंबईकरांना हा अनुभव घेण्याची उत्सुकता लागली आहे. शासनाच्या निर्णयानुसार आज सोमवार, दिनांक २७ जानेवारीपासून मुंबईत नाइट लाइफ सुरू होणार असून मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट व दुकानं २४ तास सुरू राहणार आहेत. मात्र, पब आणि बारसाठी वेळेची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्याचा आणि मुंबई महापालिकेचा महसूल वाढणार असल्याचा दावाही सरकारकडून करण्यात आला आहे.
पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाइट लाइफ सुरू होत आहे. मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्यासाठी आदित्य ठाकरे हे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत होते. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या स्तरावर त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नाला यश आलं नव्हतं. मात्र आता ते स्वत: राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या खात्याचे मंत्री असल्याने त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं जाणार आहे. २२ जानेवारी रोजीच राज्य मंत्रिमंडळाने मुंबईच्या नाइट लाइफला मंजुरी दिली होती. दरम्यान मुंबईच्या नाइट लाइफमुळे पोलिसांवर ताण येणार नसल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट व दुकानं २४ तास सुरू राहणार आहेत. मात्र पब आणि बारला पूर्वीप्रमाणेच वेळेची मर्यादा राहील. पब आणि बार दीड वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईत स्वैराचार माजण्याच्या आणि गुन्हेगारी वाढण्याच्या विरोधकांच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘नाइट लाइफ’ सुरू होणार असली तरी दुकानं उघडी ठेवण्याची सक्ती कुणावरही केली जाणार नाही. ती बाब पूर्णपणे ऐच्छिक असेल. आठवड्याभरात आस्थापन कोणत्या दिवशी बंद ठेवायचे, याचा निर्णय व्यावसायिकांचा असणार असल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आल्याने दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी एकप्रकारे ही जमेची बाजू ठरली आहे.