भीमा कोरेगाववरुन राजकीय नेत्यांचे आरोप -प्रत्यारोप , प्रकाश आंबेडकरांना उद्देशून काय म्हणाले जयंत पाटील ?

बहुचर्चित भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणावरून भाजप , शिवसेना , काँग्रेस , राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते परस्परांवर आरोप करीत असून या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे गेल्याने हे आरोप-प्रत्यारोप केल्या जात आहेत. संभाजी भिडे यांच्या बचावासाठी आधी माजी गृहमंत्री आर.आर. पाटील होते, आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भाजपचे काम काही मंत्रीच करत असल्याचा घणाघातही प्रकाश आंबेडकरांनी केला यावेळी केला.
प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना जयंत पाटील यांनी सांगलीत बोलताना आंबेडकरांचा हा आरोप हास्यास्पद असून स्वतः प्रकाश आंबेडकरच मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना वाचवत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी आपल्या साक्षमध्ये भिडे, एकबोटे यांचे नाव का घेतले नाही, याचा अर्थ आंबेडकर हेच भिडे आणि एकबोटे यांची पाठराखण करत आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , पोलिस अधीक्षकांच्या वतीने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. संभाजी भिडेंच्या बचावाला जयंत पाटील आहेत ना, पूर्वी आर आर पाटील होते. आता जयंत पाटील आहेत. भाजपचं काम काही मंत्रीच करत आहेत. कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास ‘एनआयए’कडे देण्याचा निर्णय निषेधार्ह आणि चुकीचा आहे. तपासातील खोटेपणा उघड होण्याची सरकारला भीती वाटते, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटाची चर्चा फक्त ‘टीआरपी’ वाढवण्यासाठी आहे, अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली.
दरम्यान भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित तपास राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीकडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘सत्य बाहेर येण्याच्या भितीमुळे केंद्र सरकारने या प्रकरणात एनआयकडे तपास दिला आहे,’ असा घणाघाती आरोप शरद पवार यांनी केला आहे.