महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या वतीने तलवार , भाजपवर टीकेचा भडीमार, आमचा ना रंग बदलला ना अंतरंग : उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज बीकेसी येथे आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात बाळासाहेबांसोबत काम केलेल्या ११ ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर छोटेखानी भाषणात उद्धव यांनी भाजपवर सडकून टीका केली व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यामागचे कारण स्पष्ट केले. २०१४ मध्ये तुम्ही अदृश्य हातांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केलाच होता. मी जी जबाबदारी स्वीकारली होती ती माझ्या स्वप्नातही नव्हती. शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला अशी टीका झाली. मात्र मला आज भाजपाला विचारायचं आहे की तुमचं काय काय उघड झालं? युती तर तुम्ही २०१४ लाच तोडली होती आणि आज आम्हाला नावं ठेवत आहात का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला करीत , आमचा चेहरा उघड झालेला असेल पण तुम्ही तर अख्ये उघडे पडलेले आहात. मी कधीही खाेटे बाेलणार नाही, प्राण गेले तरी . ना रंग बदलला ना अंतरंग, आमचा भगवा कायम आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि , बाळासाहेबांच्या खोलीत बसून दिलेला शब्द भाजप नेतृत्वाने मोडला आणि मला खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच मला वेगळा विचार करावा लागला, २०१४ मध्येही शिवसेनेने काँग्रेसपुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता, या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत. त्या विधानाचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. शिवसेनेचा चेहरा वगैरे उघडा पडलेला नाही तर तुम्हीच अख्खे उघडे पडले आहात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. शिवसेनेचा रंग आणि अंतरंग भगवा आहे आणि तो भगवाच राहणार आहे, असेही मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज निक्षून सांगितले.
सत्काराला उत्तर देताना ते म्हणले कि , मुख्यमंत्री झाल्यानंतर मी एकही सत्कार स्वीकारला नाही. मात्र आज हक्काने माझ्या शिवसैनिकांकडून हा पहिला सत्कार स्वीकारत आहे. मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे. मी जी जबाबदारी घेतली आहे त्यास न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्यातून मी कधीही पळ काढणार नाही, असे नमूद करतानाच ही वचनपूर्ती नाही तर त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांना तलवार भेट देण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला. रश्मी ठाकरे यांची महिला शिवसैनिकांनी पारंपारिक पद्धतीने ओटी भरली. यावेळी मनोरंजनात्मक रंगारंग कार्यक्रम ठेवण्यात आला होता.