अयोध्येत फक्त राम मंदिर व्हावे , मशीद अयोध्येच्या हद्दी बाहेर व्हावी , प्रवीण तोगडियांचा तर्क

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या कारवाईला सुरुवात झाली असताना , मुस्लिमांना मशीद बांधायची असेल तर, ती अयोध्येच्या हद्दीच्या बाहेर बांधली जावी. कारण अयोध्या हे अध्यात्मिक शहर आहे. अयोध्येच्या हद्दीत मशीद बांधू नये आणि हे योग्य ठरणार नाही. यामुळे हिंदू समाज नाराज होईल, असे विधान आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले असल्याने नवा वाद निर्माण ह्ण्याची चिन्हे आहेत. जसे मक्केत मंदिर बांधलं जाऊ शकत नाही, याबाबतीतही तसंच आहे, असा तर्क त्यांनी व्यक्त केला.
याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले कि , अयोध्येमध्ये राम मंदिर बांधले पाहिजे, पण आपण स्वतः या ट्रस्टमध्ये सहभागी होण्यास इच्छुक नाही. मंदिर बांधणे हे एक धार्मिक कार्य आहे. त्यामुळं या ट्रस्टमध्ये संत, आखाडे आणि धार्मिक व्यक्ती असल्या पाहिजेत. हा राजकीय आखाडा होऊ नये यासाठी मंदिर ट्रस्टमध्ये राजकीय व्यक्तींना सहभागी करून घेऊ नये, असं स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केलं. ज्याप्रमाणं सोमनाथ मंदिरासमोर हमीर सिंह गोहिल यांची समाधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा लावलेली आहे. त्याप्रमाणे राम मंदिराच्या समोर महंत रामचंद्र दास, महंत अवैद्यनाथ आणि अशोक सिंघल यांचा पुतळा बसवावा त्यामुळं त्यांचं जीवन आणि मंदिर उभारणीसाठी झालेल्या आंदोलनाबाबत लोकांना माहिती मिळेल, अशी मागणी तोगडिया यांनी केंद्र सरकारकडे केली.