‘लिव्ह इन रिलेशनशिप ’ मध्ये राहत असलेल्या महिलेचा खून करून ‘तो ‘ स्वतः पोलीस ठाण्यात झाला हजर

‘लिव्ह इन रिलेशनशिप ’ मध्ये राहत असलेल्या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन खलबत्त्याने डोके ठेचून तिची हत्या केल्याची घटना नागपूर येथील आंबेडकरनगरमधील सम्राट अशोक चौक येथे बुधवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याला अटक केली आहे. अलका सोनपिंपळे (वय २८) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून सिद्धार्थ प्रेम सोनपिंपळे (वय ३५) असे मारेकऱ्याचे नाव आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ एमआयडीसीतील कंपनीत पेंटिंगचे काम करतो. त्याची पहिली पत्नी अपत्यांसह वेगळी राहते. अलकाही विवाहित होती. तीन महिन्यांपूर्वी तिची सिद्धार्थसोबत ओळख झाली. ती पहिल्या पतीला सोडून सिद्धार्थ याच्यासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहायची. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अलका घरुन निघाली. गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ती घरी परतली. रात्रभर गायब असल्याने सिद्धार्थ याने तिला जाब विचारला. दोघांमध्ये वाद झाला. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये वाद झाला.
भांडणामुळे संतप्त सिद्धार्थ याने खलबत्त्याने डोके ठेचून अलकाची हत्या केली. तिचा मृतदेह पलंगावर ठेऊन घराला कुलूप लावून सिद्धार्थ पसार झाला. रात्री १० वाजताच्या सुमारास त्याने वाडी पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस त्याला घेऊन घटनास्थळी गेले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आला. खुनाचा गुन्हा दाखल करून सिद्धार्थ याला अटक केली आहे.