मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकादमीचे संचालक सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवून , चौकशी समितीची स्थापना, आंदोलन मागे

मुंबई विद्यापीठाच्या थिएटर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांच्या कारभारासाठी सत्यशोधन समितीची स्थापना करून त्यांच्याबाबत चार आठवड्यात निर्णय घेतला जाईल . दरम्यानच्या काळात चौकशी नि:पक्ष व्हावी म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा असे लेखी पत्र विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांनी दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन तूर्त स्थगित केले. दरम्यान या आंदोलनाला आ. कपिल पाटील यांनी पाठिंबा दर्शविला आहे. अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांची हकालपट्टी करावी यासह अन्य विविध मागण्यांसाठी या विद्यार्थ्यांनी दिवसभर हे आंदोलन केले. विद्यापीठ प्रशासन ठोस कारवाई करत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतल्याने अखेर रात्री ११.४५ वाजता विद्यापीठ प्रशासनाने सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल, असे लेखी आश्वासन विद्यार्थ्यांना दिले यानंतर रात्री उशिरा विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
दरम्यान सोमण यांनी फेसबुक आणि ट्विटरवर स्वत:चा एक व्हिडीओ अपलोड केला. यात त्यांनी राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविरोधात केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली होती. त्याला एनएसयूआय विद्यार्थी संघटनेने विरोध दर्शविला आहे. यावरून सोमण यांचे नाव चर्चेत असताना आता विद्यार्थ्यांनी विभागातर्फे योग्य शिक्षण मिळत नसल्याचा आरोप केला आहे. विभागाने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अभ्यासक्रम दिलेला नाही. कोणताही विषय शिकवत असताना त्याचे प्रात्यक्षिक योग्य प्रकारे शिकविले जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांना विषय पूर्णपणे कळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी आंदोलन करताना विद्यापीठ प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर जे अभ्यासक्रम होणे अपेक्षित होते त्याचे कोणतेही अध्ययन झाले नाही. याबाबत यापूर्वी २५ नोव्हेंबर रोजी कुलगुरूंकडे तक्रार करण्यात आली होती. यानंतर काही वर्ग भरविण्यात आले होते. मात्र ते पुरेसे नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटले आहे कि , या अभ्यासक्रमाच्या माहिती पुस्तिकेत ज्या तज्ज्ञ व्यावसायिकांची नावे अध्ययन करण्यासाठी देण्यात आली आहेत त्यांच्यापैकी कोणाचेही व्याख्यान झालेले नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर अनेकदा प्राध्यापक हे त्यांचे अध्ययन विषय नसलेले विषय शिकविण्यासाठी पाठविले जातात. यामुळे आम्हाला परिपूर्ण शिक्षण मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित विभागाचे संचालकांची हकालपट्टी करावी व सक्षम संचालकांची नियुक्ती करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. तसेच लवकरच यावर उत्तरे दिली जातील असे आश्वासन दिले. यानंतरही विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने रात्री उशीरापर्यंत आंदोलन सुरू होते. या सर्व प्रकारानंतर विद्यापीठ सोमण यांचा बचाव करत असल्याचा आरोप एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव निखिल कांबळे यांनी केला आहे. सोमण यांच्यावर वेळीच कारवाई झाली नाही तर एनएसयूआय बेमूदत उपोषण करेल असा इशाराही कांबळे यांनी दिला होता. या सर्व प्रकारानंतर विद्यापीठ प्रशासनाने लेखी आश्वासन दिले.