संरक्षण मंत्री आणि हवाई दल प्रमुखांकडून अभिनंदन यांच्या प्रकृतीची चौकशी

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान काल रात्री सुखरूप भारतात पोहोचल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली . आज दिवसभरात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी त्यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली . जखमी अभिनंदन यांच्यावर सध्या दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तत्पूर्वी सकाळी अभिनंदन यांनी हवाई दलप्रमुख बी.एस. धनोआ यांची भेट घेऊन त्यांना पाकिस्तानच्या ताब्यात असताना नेमकं काय घडलं त्याची माहिती दिली. पाकिस्तानच्या एफ-१६ या लढाऊ विमानाचा निकरानं प्रतिकार करताना अभिनंदन यांचं मिग-२१ विमान कोसळलं आणि ते पॅराशूटच्या सहाय्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये उतरले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांना शुक्रवारी भारताच्या ताब्यात सुपूर्द केल्यानंतर अभिनंदन यांचं देशात जल्लोषात स्वागत झालं. रविवारपर्यंत अभिनंदन यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या घेण्यात येणार आहेत.
दरम्यान शनिवारी सकाळी अभिनंदन त्यांच्या कुटुंबियांना भेटले. एअर फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली. शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास अभिनंदन दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यांना लगेचच एअर फोर्सच्या सेंट्रल मेडिकल केंद्रात नेण्यात आले. एअर फोर्सच्या कुलिंग डाऊन प्रोसेस अंतर्गत सध्या अभिनंदन यांच्या वेगवेगळया वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत. रविवारपर्यंत या चाचण्या सुरु राहतील अशी माहिती आहे.