मातोश्रीवरील तीन तासांच्या चर्चेनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रेसच्यासमोर खैरे -सत्तार यांचा हात हातात दिला …!!

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या राजकारणातून शिवसेनेचे नेते माजी खा. चंद्रकांत खैरे आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात टोकाचा वाद झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना समोर समोर बसवून त्यांच्यात समेट घडवून आणल्याने आपला वाद मिटल्याची ग्वाही या दोन्हीही नेत्यांनी पत्रकारांसमोर दिली आहे. या दिलजमाईनंतर प्रेसशी बोलताना हे दोन्हीही नेते म्हणाले कि , आमचे गैरसमज आता दूर झाले असून आमच्यात काही वाद नाहीत. यापुढे आम्ही एकदिलानं आणि एकजुटीनं काम करणार आहोत.
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या वादातून खैरे आणि सत्तार यांच्यात चांगलीच तू तू मै मै झाली होती . सत्तारांना गद्दार संबोधून या हिरव्या सापाला मातोश्रीची पायरी चढू देणार नाही असा दम खैरे यांनी अब्दुल सत्तार यांना दिला होता त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मानसिकता तयार केली होती परंतु मातोश्रीच्या आदेशावरून शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीं तत्काळ अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले होते . दरम्यान सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट घेऊन आपली बाजू मांडली तर आज उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार यांना समोर समोर ऊन त्यांच्यातील वादावर पडदा टाकला. आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास हे दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांना भेटले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांशी तब्बल तीन तास चर्चा केली.
दरम्यान या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी दोघांचाही हात एकमेकांच्या पाहत देत या दोन्ही नेत्यांमधील वाद संपल्याचं स्पष्ट केलं. दोन्ही नेत्यांचे गैरसमज दूर झाले आहेत. दोघांनी पक्षप्रमुखांना त्रास होणार नाही, असं काम करणार नसल्याचा शब्द दिला आहे. दोन्ही नेते पक्षाच्या शिस्तीत आणि चौकटीत राहून कामं करतील. पक्षाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणार आहेत, असं शिंदे म्हणाले. सत्तार यांच्या राजीनाम्याच्या बातम्या विरोधकांनी पसरविल्या होत्या, असा आरोपही शिंदे यांनी केला. तर आमचा रिमोट कंट्रोल मातोश्रीच आहे. त्यामुळे पक्षाच्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल. गैरसमजातून ज्या घटना झाल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती होणार नाही. आमच्यातील वाद मिटले असून सर्व गैरसमज दूर झाले आहेत, असं सत्तार यांनी सांगितलं. खैरे यांनीही सर्व गैरसमज दूर झाल्याचं सांगत शिवसेना वाढवण्यासाठी हातात हात घालून काम करू, अशी ग्वाही दिली.