चर्चेतली बातमी : ” वीर सावरकर कितने वीर ? ” पुस्तिकेवरून सावरकरांचे नातू का झाले संतप्त ? मुख्यमंत्र्यांनीही टाळली भेट

R Savarkar: I came to meet CM; I had sent several requests for appointment but I could not meet him today. He didn't have a minute to talk to me even when it's about Savarkar ji's respect. I am highly disappointed. It is an insult to Savarkar ji. #Maharashtra https://t.co/DwjzUJYS3j
— ANI (@ANI) January 3, 2020
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ” ” वीर सावरकर कितने वीर ? ” अशा शीर्षकासह वादग्रस्त मजकूर असणारी पुस्तिका मध्य प्रदेशात काँग्रेसच्या नावावर वितरित करण्यात येत आहे. नथुराम गोडसे आणि सावरकर यांचे समलिंगी संबंध असल्याचा उल्लेख या पुस्तिकेत आहे. अत्यंत खालच्या थराला जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आरोप करणाऱ्या काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर खटले दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला भेटीसाठी वेळ दिली नाही, त्यामुळे मी निराश झालो आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.
या प्रकरणी बोलताना सावरकर म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आलो होतो. त्यांच्या भेटीसाठी मी त्यांना अनेक विनंत्या केल्या, मात्र आज त्यांची भेट होऊ शकली नाही. सावरकरांच्या सन्मानाबाबत माझ्याशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे एक मिनिटही वेळ नव्हता. त्यामुळे मी खूपच निराश झालो आहे. हा एक प्रकारे सावरकरांचा अपमानच आहे.”
दरम्यान, या नव्या वादावर भाजपानेही काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. यावर बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचे आराध्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत अतिशय घाणेरडे आणि आक्षेपार्ह लिखाण असलेली पुस्तिका (बुकलेट) काँग्रेस पक्षाने वितरित करून आपल्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडविले आहे. काँग्रेस पक्षाची ही बौद्धिक आणि मानसिक दिवाळखोरी आहे. या अशा दिवाळखोर पक्षाशी अनैसर्गिक आघाडी केलेली शिवसेना तीव्र निषेध नोंदवून या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालणार की केवळ सत्तेसाठी आपल्या आराध्यांचे असे अपमान वारंवार सहन करणार? याचे उत्तर आम्हाला हवे आहे.” भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर घणाघाती टीका करीत शिवसेनेलाही लक्ष्य केले आहे.
सावरकरांबद्दल अपप्रचार करणारे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सेवादलाविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी मागणी करण्यासाठी स्वा. सावकरांचे नातू रणजीत ठाकरेंची भेट घेण्यासाठी उत्सुक होते. पण मुख्यमंत्री ठाकरे त्यांना न भेटताच निघून गेले. रणजीत सावकर यांनी चिठ्ठी पाठवून आणि मेसेज करून भेटायची वेळ मागितली होती. पण ठाकरे यांनी त्यांना भेट दिली नाही. त्यामुळे रणजित सावरकर संतप्त झाले होते.
सावकरांविषयी वादग्रस्त मजकूर असलेली ही पुस्तिका (booklet) मध्य प्रदेशात भोपाळमध्ये वाटण्यात आली. या पुस्तिकेवरून वादाला तोंड फुटलं आहे. सावरकर यांची बदनामी करणाऱ्या पुस्तिकेवर महाराष्ट्रात बंदी घाला, अशी मागणी भाजपने केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावरकर देशाला प्रिय आहेत आणि यापुढेही राहतील, असं स्पष्ट केलेलं असलं, तरी आता कारवाईप्रश्नी शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.