देशात राहणाऱ्या सर्वांना हिंदू म्हणणे योग्य नाही, मोहन भागवत यांच्या विधानावर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी भारतातील १३० कोटी जनता हिंदूच आहे, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आक्षेप घेतला आहे. देशात राहणाऱ्या सर्वांना हिंदू म्हणणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली आहे.
मोहन भागवत यांच्या विधानाबाबत आठवले यांनी स्पष्ट शब्दांत आपला आक्षेप नोंदवला. या देशातील सर्व नागरिक हिंदू आहेत, असे म्हणणं योग्य ठरणार नाही. येथे एक काळ असा होता की, देशात सर्वच बौद्ध होते. आता हिंदुत्व येताच भारत हिंदूराष्ट्र म्हटले जात आहे, असे नमूद करतानाच देशात राहणारे सगळेच आपले आहेत, असे भागवत यांना म्हणायचे असेल तर ती चांगली बाब आहे. त्याला हरकत असण्याचे कारण नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हैदराबाद येथे आयोजित तीन दिवसीय विजय संकल्प शिबीरात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील १३० कोटी जनतेबाबत विधान केले होते. देशात राहणारी १३० कोटी जनता कोणत्याही धर्माची आणि संस्कृतीची असली तरी आरएसएस या सर्वांना हिंदूच मानत आला आहे. धर्म आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन जे लोक राष्ट्रवादी विचारांचे आहेत. भारताची संस्कृती आणि परंपरा यांचा जे सन्मान राखतात ते सारेच आमच्यासाठी हिंदू आहेत, असे भागवत म्हणाले होते. देशातील सारी जनता आमचीच आहे आणि या सर्वांना एकजूट ठेवून एका सशक्त समाजाची जडणघडण करणे हेच संघाचे ध्येय आहे, असेही भागवत म्हणाले होते.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही मोहन भागवत यांच्या विधानावर टीकास्त्र सोडले होते. ते म्हणाले कि , तेलंगणची जनता आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जोपर्यंत केसीआर जिवंत आहेत तोपर्यंत निदान तेलंगणमध्ये तरी भाजप आणि आरएसएसचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींना तेलंगणची जनता कधीही थारा देणार नाही.