महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्यांच्या दोन गटात हमारी

महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्राध्यपकांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हाणामारीत कॉलेजमधील साहित्याचं मोठ्य़ा प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. महाविद्यालयात अक्षरश: दांडके, दगड विटा घेऊन प्राध्यापकांच्या दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
उपलब्ध माहितीनुसार प्राचार्यपदाचा वाद विकोपाला गेल्यानं ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात हा प्रकार घडल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. प्राचार्य पदावरून गेली अनेक वर्ष वाद आहे. तोच वाद गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानं उफाळून येत होता. अखेर आज हा वाद विकोपाला गेला आणि प्राध्यापकांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. दांडके, दगड विटा घेऊन ही हाणामारी करण्यात आली. या घटनेमध्ये ६ जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य धनाजी गुरव यांच्या खुर्चीचा ताबा प्राचार्य सुरेश आठवलेंनी घेतला. दरम्यान प्राचार्यांच्या परस्पर प्राचार्य पदाच्या खुर्चीचा ताबा घेतल्याने वादाला तोंड फुटले. प्राध्यापक आठवले यांनी परस्पर प्राचार्य म्हणून काम पाहण्यास सुरुवात केल्याने प्राध्यापकांचा एक गट नाराज होता. त्यामुळे धनाजी गुरव आणि सुरेश आठवले या दोन प्राध्यापकांच्या गटांमध्ये हाणामारी झाली. धक्कादायक बाब म्हणजे या मारामारीत महाविद्यालयातील खुर्च्या, टेबल, इतकच नाही तर दारे खिडक्या , महाविद्यालयाच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.