सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चेची तयारी : रविशंकर

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरु असून अनेक ठिकाणी हिंसाचार करण्यात येत आहे. पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. अहमदाबाद आणि लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली असून पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.
दरम्यान केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत, मात्र तुकडे-तुकडे गँग, शहरी नक्षलवादी किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा करणार नाही असे सांगितले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये (एनआरसी) कोणत्याही भारतीय मुस्लीम नागरिकासोबत भेदभाव केला जाणार अशी ग्वाही दिली.
रवीशंकर प्रसाद यांनी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत नागरिकत्व विधेयकावरुन सुरु असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. “ही आंदोलनं आमच्या राजकीय विरोधकांकडून पुरस्कृत आहेत. नागरिकत्व कायदा कोणत्याही भारतीय नागरिकाला लागू होत नाही. यामध्ये भारतीय मुस्लिमांचाही समावेश आहे. त्यांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. ते भारताचे नागरिक म्हणून कायम राहतील,” असं रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे.