हैदराबादेतील महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील ठार झालेले आरोपी सवयीचे गुन्हेगार , या पूर्वीही केल्या होत्या ९ घटना

हैदराबादेतील महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चकमकीत ठार झालेल्या आरोपींनी या डॉक्टरच्या आधीही एका तृतीयपंथीयासह नऊ महिलांवर अत्याचार करून त्यांना जाळून मारल्याची धक्कादायक माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हैदराबादेत गेल्या २७ नोव्हेंबर रोजी चौघा नराधमांनी महिला डॉक्टरवर सामूहिक अत्याचार करून तिला जाळून मारलं होतं. या प्रकरणी मोहम्मद आरिफ, जे. नवीन, जे. शिवा आणि चेनाकेशवुलू यांना अटक करण्यात आली होती. चौकशीसाठी घटनास्थळावर नेले असता या नराधमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्याआधी पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी ही कबुली दिली होती असे या अधिकाऱ्याने सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
या प्रकरणात अधिक माहिती देताना हा अधिकारी म्हणाला कि , ‘दिशाच्या हत्येच्या प्रकरणात त्या चौघांना अटक केल्यानंतर आम्ही कर्नाटक व तेलंगण हायवेवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या १५ घटनांसदर्भात त्यांची चौकशी सुरू केली. चौघांपैकी आरिफ आणि चेन्नाकेशवुलू यानी नऊ बलात्कार व हत्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. तेलंगणातील संगारेड्डी, रंगारेड्डी व मेहबूबनगर तसंच, कर्नाटकच्या सीमावर्ती भागांत त्यांनी हे गुन्हे केले होते. त्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्यांमध्ये वेश्या आणि तृतीयपंथीयांचाही समावेश होता. त्यासाठी पोलीस पथकं घटनास्थळी पाठवण्यात आली असून या सर्व प्रकरणांची आम्ही सखोल चौकशी करत आहोत.’
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाशी संबंधित चौघा दोषींची चकमकीत हत्या झाल्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती व्ही. एस. शिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्यातच पोलीस तपासात हि माहिती उघड झाली आहे.