नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनामागे काँग्रेसचा हात , पंतप्रधान मोदींचा थेट आरोप

लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात भारतातील अनेक राज्यात आंदोलनाचा भडका उडाला असून राजधानी दिल्लीतही त्याचे पडसाद उमटले आहेत. या आंदोलनावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभर जो असंतोष आहे त्यामागे कोण आहे हे माहित आहे. लोकांच्या भावना भडकविण्यासाठी काँग्रेसनेच चिथावणी दिल्याचा आरोप केला आहे झारखंडमधल्या दुमका इथं एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. जे लोक आगी लावत आहेत त्यांच्या कपड्यांवरूनच ते कोण आहेत हे कळून येते या विषयी अधिक सांगायची गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसने या विधेयकाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचबरोबर काँग्रेसच्या काही नेत्यांनी या विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टातही याचिकाही दाखल केलीआहे.
दिल्लीतल्या जामिया भागात गेल्या काही दिवसांपासून निदर्शने सुरू होती. त्यानंतर आता राजधानी दिल्लीतही रविवारी तरुणांनी रविवारी रस्त्यावर उतरून निदर्शनांना सुरुवात केली. यावेळी संतप्त तरुणांनी तीन बसेसना आगी लावल्या. शुक्रवारी तरुणांनी संसद भवनावरच मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी लाठीहल्लाही केला होता.
शनिवारी संवेदनशील असलेल्या पश्चिम बंगालमध्येही या विधेयकाविरोधात निदर्शने करण्यात येत असून मोठा भडका उडाला आहे. मुर्शिदाबाद जवळच्या कृष्णापोरे रेल्वे स्टेशनवर उभी असलेली एक रिकामी गाडीच पेटवून दिली. तर बेलडांगा हे रेल्वे स्टेशनलाही आग लावली. २०० ते ३०० लोकांचा संतप्त जमाव निदर्शने करत होता. हा जवाम अनियंत्रित झाला आणि त्यांनी रेल्वे आणि रेल्वे स्टेशन पेटवून दिलं. सुदैवाने ट्रेनमध्ये कोणी नव्हतं त्यामुळे मोठी जिवित हानी टळली गेली. या आगीमुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकारवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षादलाला तैनात करण्यात आलंय.