सततच्या टोमण्याला वैतागलेल्या पतीने बायकोवर कुऱ्हाडीचे घाव घालून स्वतःही धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी

बायकोच्या सततच्या टोमण्याला वैतागलेल्या पतीने कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या केली आणि काही वेळानंतर स्वतः सुद्धा धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. जळगाव जिल्ह्यातील खेडी गावातील डॉ.बाबाबसाहेब आंबेडकरनगरात बुधवारी पहाटे ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे, पत्नीच्या खुनाची घटना ही त्यांच्या १२ वर्षीय मुलीच्या डोळ्यासमोर घडली. सोनल समाधान सावळे (३०) आणि समाधान सावळे (३५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनल आणि समाधान यांचे २००६ मध्ये लग्न झाले होते . लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी समाधान सावळे हे कामानिमित्ताने सुरत इथं गेले होते. काही महिन्यापूर्वीच काम सोडून ते गावी परतले होते. मंगळवारी गावी परतल्यानंतर रात्री उशीरा पत्नी, मुल आणि मेव्हण्यासोबत त्यांनी जेवण केलं. यावेळी त्यांनी पत्नीची थटामस्करीही केली. त्यानंतर त्यांची मुलं प्रज्ञा (वय १०), राज (७), अंजली (१२), आणि मेहुणे ज्ञानेश्वर सोनवणे आणि त्यांची मुलगी नेहा असे सर्वजण समाधान यांच्या घरात झोपले होते. परंतु, पहाटे अचानक समाधान याने पत्नीवर प्राणघातक हल्ला केला. कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या केली. पत्नीवर जेव्हा समाधान याने कुऱ्हाडीने वार केले होते, तेव्हा आवाज झाल्यामुळे त्यांची मुलगी अंजली जागी झाली. जखमी अवस्थेत असलेल्या सोनलने मुलीकडे पाणी मागितले पण समाधानने पाणी देऊ दिलं नाही. तडफडतच तिने प्राण सोडले.
दरम्यान पत्नीची हत्या केल्यानंतर समाधानने घरातून पळ काढला. त्यानंतर मुलगी अंजलीने शेजारी राहणाऱ्या मामांच्या घरी धाव घेतली आणि सगळी हकीकत सांगितलं. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबद्दल माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत पत्नी सोनम यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. पत्नीच्या हत्येनंतर समाधान याने रेल्वे रुळाकडे धाव घेतली आणि धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.