Unnao Case : गुन्हेगारांना सोडू नका… मृत्यू पूर्व जबाब देऊन तिने घेतला शेवटचा श्वास

उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील सामूहिक बलात्कारपीडितेला आरोपींनी पेटवून दिल्यानंतर रात्री उशिरा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. पाच जणांनी या पीडितेला जिवंत पेटवून दिलं होतं. मात्र, तिला घटनेनंतर रुग्णालयात नेत असताना, ‘मी वाचेन ना?’ असे आपल्या भावाला ती पुन्हा पुन्हा विचारत होती. मात्र, ९० टक्के भाजलेल्या या पीडितेची मृत्यूशी झुंज चालू होती ती अखेर संपली. सुमारे ४० तासापर्यंत तिची हि झुंज चालू होती. काल रात्री ११.४० वाजता सफदरजंग हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पीडितेने तिच्या भावाला गुन्हेगारांना सोडू नका सांगितले होते. सध्या चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींप्रमाणे माझ्या मुलीच्या आरोपींना शिक्षा द्या, अशी मागणी उन्नाव बलात्कार पीडितीच्या वडिलांनी केली आहे. दरम्यान, बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. तसंच मारहाणदेखील करण्यात आली असल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली. आपल्याला पैसे किंवा अन्य कोणत्याही गोष्टीची लालसा नाही. परंतु या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
पीडिता ९० टक्के भाजलेली असतानाही ती शुद्धीत होती, तसेच तिचा रक्तदाब, पल्सरेट सर्वकाही सामान्य होते, असे हॉस्पिटलमधील सूत्रांनी सांगितले. मात्र, संसर्ग किंवा सेप्टिसीमिया होण्याचा धोका असल्याने पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेला आरोपींनी फक्त पेटवूनच दिले नव्हते, तर आरोपींनी तिच्यावर काठीने हल्ला केला होता. तसेच आग लावण्यापूर्वी तिच्या गळ्यावर वारही केले होते. त्यानंतर, ती जखमी होऊन खाली पडल्यानंतर तिच्यावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. जळालेल्या अवस्थेत ती मदतीसाठी ओरडत होती परंतु कोणीही तिच्या मदतीला आले नाही.
एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच अवस्थेत पीडितेने सुमारे १ किमीचे अंतर स्वत: कापले आणि पोलिसांकडून मदत मागितली. उन्नावमधील बिहार पोलिस स्टेशन परिसरातील सिंदूपूर गावात ही घटना घडली. पीडिता जेव्हा पूर्णपणे आगीत होरपळलेली असताना समोर आली तेव्हा आम्ही घाबरून गेल्याचे घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि पीडितेच्या शेजाऱ्यांनी सांगितले. ती कोण आहे हे आम्हाला ओळखता आले नाही. त्यानंतर तिने आपले नाव सांगितले. जेव्हा आम्ही पोलिसांना कॉल केला तेव्हा पीडिता स्वतः पोलिसांशी बोलली आणि मदतीची विनंती केली. थोड्याच वेळात पोलिस आले आणि तिला गाडीतून घेऊन गेले.