Pune : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले पंतप्रधानांचे महाराष्ट्रात स्वागत , कोणत्याही चर्चेविना भेट संपली

पुणे शहरात होत असलेल्या पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे आज रात्री पुण्यात आगमन झालं. राजशिष्टाचारानुसार मुख्यंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर हजर होते. महाराष्ट्रातील सत्तांतर आणि विधानसभेचा प्रचार संपल्यानंतरची त्यांची ही पहिलीच भेट होती. त्यांनी पंतप्रधानांचं स्वागत करत हस्तांदोलन केलं. याच वेळी माजी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीसही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच रांगेत पंतप्रधानांच्या स्वागताला उभे होते. पण औपचारिकतेशिवाय दोघांमध्ये फारसं बोलणं झालं नाही . ही भेट फक्त १० मिनिटं चालली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे मुंबईकडे तर फडणवीस हे नागपूरला रवाना झाले.
या भेटीत उद्धव ठाकरे आणि पंतप्रधानांचं नेमकं काय बोलणं होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण १० मिनिटांत त्यांच्यात कुठलीही चर्चा झाली नाही. या आधी अमित शहा हे पुण्यात दाखल झाले होते. राज्यपाल , उद्धव ठाकरे , देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच अमित शहा हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. परंतु स्वागतानंतर सर्व जण निघून गेले.
देशातल्या सर्व राज्यांचे पोलीस प्रमुख आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी यांची परिषद दरवर्षी होत असते. त्या बैठकीला पंतप्रधान आणि गृहमंत्री उपस्थित राहतात. २०१४ पर्यंत ही बैठक दिल्लीत होत असे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर विविध राज्यांमध्ये दरवर्षी दिल्ली बाहेर ही परिषद घेण्याचा पायंडा मोदींना पाडला. त्यानुसारच ही परिषद यावर्षी पुण्यात होत आहेत. देशभरातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा, राज्य स्तरावर पोलीस दलांमध्ये करायचे आवश्यक बदल, पोलीस आणि गुप्तचर संस्थांमध समन्वय वाढवणं असे अनेक विषय या बैठकीत चर्चेला येणार आहेत. यंदा ही बैठक पुण्यात ७ ते ८ डिसेंबर अशी होणार आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असून पुण्यात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
या परिषदेला सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक, गुप्तचर संस्थांचे प्रमुख, ज्येष्ठ पोलीस अधिकारी, गृहमंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि उप सुरक्षा सल्लागार दत्ता पडसलगीकर हेही या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.