आपलं सरकार : महाराष्ट्रातील सहा शैक्षणिक संस्थांचा शासनाकडून गौरव

The Secretary, Department of Higher Education, Shri R. Subrahmanyam presenting the Swachh Campus Ranking Awards 2019 of Higher Educational Institutions, at a function, in New Delhi on December 03, 2019.
महाराष्ट्रातील सहा शैक्षणिक संस्थांना आज तिसऱ्या ‘स्वच्छता रँकिंग’ पुरस्काराने गौरविण्यात आले. महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये पहिले तीनही पुरस्कार राज्यातील महाविद्यालयांनी पटकाविले आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने येथील एआयसीटीई सभागृहात आयोजित सभारंभात आज मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव आर. सुब्रमन्यम यांच्या हस्ते ‘स्वच्छता रँकिंग पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
‘स्वच्छ भारत’ कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने देशभर राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता रँकिंग’ पुरस्कारामध्ये देशातील 27 विद्यापीठ आणि 20 महाविद्यालयांना एकूण 8 श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राज्यातील तीन महाविद्यालयांनी राखले अग्रक्रम
देशातील महाविद्यालयांना चार श्रेणींमध्ये ‘स्वच्छता रँकिंग’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून मान्यताप्राप्त अनिवासी (विनावसतिगृह) महाविद्यालयांच्या श्रेणीत पहिले तीनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले. नवी मुंबई येथील महात्मा गांधी मिशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाला पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला दुसऱ्या क्रमांकाच्या तर पुण्यातील निगडी येथील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या श्रेणीत एकूण 5 महाविद्यालयांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पहिल्या १० मध्ये राज्यातील २ विद्यापीठ
विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताप्राप्त निवासी (वसतिगृह) विद्यापीठांच्या श्रेणीत देशातील एकूण 10 विद्यापीठांना स्वच्छता रँकिंग पुरस्काराने गौरविण्यात आाले. महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांना या श्रेणीत सन्मानित करण्यात आले. या श्रेणीत पुणे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला तिसऱ्या क्रमांकाचा तर याच शहरातील डॉ. डी .वाय.पाटील विद्यापीठाला 9 व्या क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताप्राप्त अनिवासी (विनावसतिगृह) विद्यापीठांच्या श्रेणीत देशातील एकूण 5 विद्यापीठांना स्वच्छता रँकिंग पुरस्काराने गौरविण्यात आले. यात नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला चौथ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वच्छता रँकिंग पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून देशभरातील ६ हजार ९०० शैक्षणिक संस्था यात सहभागी झाल्या होत्या.