देशात आता ‘एक देश, एक रेशन कार्ड’ : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची घोषणा

देशभरात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा जोरदार रंगलेली असताना आता ‘एक देश, एक रेशन कार्ड’ मोहीम राबवणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. येत्या एक जूनपासून देशात एक देश, एक रेशनकार्ड सुरू करणार असल्याचे पासवान यांनी म्हटले आहे. या मोहिमेचा कामगार, व दुर्बल घटकातील लोकांना फायदा होणार आहे. या कार्ड अंतर्गत देशातील कोणत्याही भागातून रेशन दुकानातून खाद्य सामान घेता येऊ शकणार आहे.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत याची माहिती दिली. ही सुविधा ई-पीओएस मशीनवर बायोमॅट्रिक आधारवर अवलंबून आहे. ही मोहीम संपूर्ण देशभरात एक जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. सध्या रेशन कार्डसाठी १४ राज्यात पॉश मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच लवकरच २० राज्यात आणि केंद्र शासीत प्रदेशात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. पुढील एक जूनपासून एक राष्ट्र, एक रेशन कार्ड सुरू करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे रामविलास पासवान यांनी म्हटले आहे.
केंद्रात भाजप सत्तेत आल्यानंतर वन नेशन, वन इलेक्शन राबवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले होते. परंतु, सत्ताधारी भाजपच्या या मोहिमेला काँग्रेससह विरोधकांनी विरोध दर्शवला आहे. लोकसभा निवडणुकी आधी वन नेशन, वन इलेक्शनची जोरदार चर्चा झाली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर यावर फारशी चर्चा झाली नाही. त्यामुळे सध्या तरी वन नेशन, वन इलेक्शन ही चर्चा थंड बस्त्यात आहे. आता जूनपासून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ सुरू होणार आहे.