मुलांना शाळेत सोडायला निघालेल्या आई-वडिलांसह मुलीचा अपघातात मृत्यू , मुलगा गंभीर जखमी

आपल्या मुलांना शाळेत सोडायला जाणाऱ्या पालकांच्या दुचाकीला डोंबिवलीमध्ये अपघात होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात आई, वडील आणि मुलगी जागीच ठार झाली तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी सांगितले कि , सकाळी गणेश चौधरी हे पत्नी उर्मिलाबरोबर होंडा एक्टिवा दुचाकीवरुन सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी कल्याणहून डोंबिवलीच्या दिशेने निघाले होते. डोंबिवलीमधील खंबाळपाडा येथे हा अपघात झाला. या अपघातामध्ये गणेश, उर्मिला आणि चार वर्षीय हंसिकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा पाच वर्षीय मुलगा देवांश हा या अपघातामधून थोडक्यात बचावला .
चौधरी कुटुंबीय कल्याण शीळ रस्त्यावरुन टाटा पॉवरकडे वळण घेत असताना खांबाळपाडा भागात त्यांची दुचाकी १०.३० च्या सुमारास आली तेव्हा रस्त्याला लागून असणाऱ्या एका गेटमधून ट्रक वेगाने बाहेर येत होता. ट्रकचा वेग बघून त्याला रस्ता मोकळा करुन देण्यासाठी गणेश चौधरी यांनी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांच्या दुचाकीचे हॅण्डल ट्रकच्या पुढील चाकाला घासले गेले आणि गाडीवरील चौघांपैकी तिघेजण ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले. ट्रक चालकाला काही समजण्याआधीच ट्रकचे मागचे चाक गणेश, उर्मिला आणि हंसिकाच्या अंगावरुन गेले. त्यामुळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर देवांश बाहेरच्या बाजूला फेकला गेल्याने बचावला. याप्रकरणामध्ये पोलिस अधिक तपास करत आहेत.