विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांसमोर राज्यपालांचे अभिभाषण , भविष्यातील संकल्प केला जाहीर

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर आज नवनिर्वाचित विधानसभेसमोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विधानभवनात अभिभाषण झाले. विशेष म्हणजे राज्यपालांनी त्यांचे संपूर्ण भाषण मराठीतून केले. यावेळी त्यांनी नव्या सरकारचे आणि निवडून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन करत नव्या सरकारचे भविष्यातील संकल्प मांडले. अवघ्या २० मिनिटाच्या या भाषणात त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यात येणार आहे. तसेच भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल आणि राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज त्यांच्या अभिभाषणातून दिली. तसेच राज्यातील आर्थिक स्थिताचा आढावा घेण्यात येणार असून हा आढाव घेऊन त्याचा अहवाल मांडण्यात येणार असल्याचेही ही राज्यपालांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले.
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari in state Assembly, earlier today: Growing unemployment is prime concern of this government. We shall enact a law to ensure 80 per cent reservation in private sector jobs for the sons of the soil. pic.twitter.com/U3PZIgTZuL
— ANI (@ANI) December 1, 2019
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शावर आमचे सरकार काम करेल, असे सांगतानाच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच नव्हे तर चिंतामुक्त करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही राज्यपालांनी दिली. मराठवाडा आणि विदर्भात शाश्वत पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येईल. मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाला विशेष प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.