जनतेच्या पैशाची उधळपट्टी नको , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पत्रकारांशी पहिलाच वार्तालाप

महाविकास आघाडीचे सरकार हे आपल्या सर्वांचे सरकार आहे, जनतेशी नम्रपणाने वागणारे सरकार आहे. कराच्या रुपाने जो पैसा आपल्याकडे येतो, तो योग्य ठिकाणी वापरला पाहिजे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही. सगळी कामं करण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या खिशातला पैसा आहे. मुंबईत जन्मलेला मी पहिला मुख्यमंत्री आहे. माझ्या मुंबईसाठी काय करायचे त्याचाही विचार सुरु आहे. शेतकऱ्यांनाही दिलेला शब्द पाळायचा आहे. आरे कारशेडला स्थगिती दिलेली आहे. कोणतेच विकासकाम रखडणार नाही, पण आपल्या हाताने आपलं वैभव आपण गमावत असू तर तो विकास नाही. याचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत आरेचं काम होणार नाही,’ असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
मंत्रालयाच्या विधीमंडळ वार्ताहर कक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिलाच वार्तालाप केला. यावेळी सरकारची पुढील ध्येयधोरणे आणि दिशा स्पष्ट करताना ते म्हणाले कि, ‘मुख्यमंत्री म्हणून मी अनपेक्षितपणे आलोय. हे तीन पक्षांचं सरकार आहे. विविध अडचणींचा सामना आम्हाला करायचाय. आतापर्यंत दोन ते तीन वेळाच मंत्रालयात आलोय. प्रथा, परंपरा माहित नसताना शिवधनुष्य उचललं आहे’, शिवसेना यापूर्वीही सरकारमध्ये होती. त्यावर नेहमी टीका केली जायची. यावरही उद्धव ठाकरेंनी भूमिका सांगितली.
‘टीका करताना चुका कळायला हव्या, फक्त ओरबाडणे म्हणजे पत्रकारिता नव्हे. आम्ही सत्तेत होतो की नव्हतो ही भूमिका कुणालाच कळली नाही. घोषणांची अंमलबजावणी होते की नाही हे काम आम्ही केलं’, असं ते म्हणाले. ‘सचिवांसोबत ओळख झाली. त्यांच्याशी चर्चा करताना हे सांगितले कि , हे आपल्या सर्वांचं सरकार आहे, जनतेशी नम्रपणाने वागणारं सरकार आहे. कराच्या रुपाने जो पैसा आपल्याकडे येतो, तो योग्य ठिकाणी वापरला पाहिजे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही. सगळी कामं करण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या खिशातला पैसा आहे.