Air Strike : भारताच्या दहशतवादी कारवायांना अमेरिकेचा पाठिंबा

दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने भारताचे समर्थन करून पाकिस्तानला पुन्हा एकदा समज दिली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात सध्या सुरू असलेल्या तणावादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ यांच्या बुधवारी रात्री उशिरा फोनवरून चर्चा झाली. पॅम्पिओ यांनी भारताने पीओकेत जात बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेली कारवाई योग्य असल्याचे सांगितले आहे. अमेरिकेचा याप्रकरणी भारताला पाठिंबा असल्याचा विश्वासही त्यांनी दिला आहे.
भारताकडून पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईवरुन अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्ससारखे देश भारताच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसत आहे. बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ यांनी पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर सुरू असलेले दहशतवादी तळ नष्ट करण्यास सांगितले. असे केले तरच दोन्ही देशातील तणाव कमी होऊ शकतो, असे पॅम्पिओ यांचे मत आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगून पॅम्पिओ म्हणाले की, पाकिस्तानने कोणतीही लष्करी कारवाई न करता सध्याची तणावाची स्थिती कमी करण्यास प्राधानय देण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवरुन कार्यरत असलेल्या दहशतवादी ठिकाणांवर सक्त कारवाई करण्याची सूचना केली आहे.