आज दिवसभरात : शिवसेनेसोबतच्या सत्ता स्थापनेबाबत शरद पवारांनी केले हात वर , म्हणाले सोनिया गांधींसोबत विषयच झाला नाही…

महाराष्ट्रातील सत्तापेचावर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून त्यावर मार्ग काढला जाईल असे काँग्रेस -राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांकडून सांगितले जात होते परंतु आज दुपारी आणि सायंकाळी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी हा विषय इतक्या सहजतेने उडवून लावला कि , जणू काही शिवसेना हा शब्द पहिल्यांदाच ऐकत आहेत. पवारांच्या या भूमिकेमुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अजूनच वाढला असून शिवसेनेसमोरील अडचणीही वाढल्या आहेत .
दरम्यान राज्यात सरकार स्थापन होणार का, कधी होणार, कुणाचं होणार, शिवसेनेला साथ द्यायला काँग्रेस – राष्ट्रवादी तयार आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भेटीनंतर मिळतील अशी अपेक्षा होती. पण सत्तास्थापनेचा पेच सुटण्यापेक्षा अधिकच वाढला आहे. सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी आमची फक्त राजकीय परिस्थितीविषयी आपसांत चर्चा झाली असल्याची माहिती पवारांनी दिली. चर्चेचे सोडा आमच्यात शिवसेनेचा विषयच निघाला नाही , असं शरद पवार म्हणाले.
इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात त्यांच्यात आणि आमच्यात काही चर्चाच झाली नाही , कोणताही किमान सामान कार्यक्रम ठरला नाही . सरावंच पक्षाचे आमदार एकमेकांना भेटत तसे ते भेटले असतील . मला त्याविषयी काही माहिती नाही असेही पवार म्हणाले तेंव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या . मग महाराष्ट्रातील सरकार कधी बनणार ? असे विचारले असता पवार म्हणाले , सहा महिन्याचा वेळ आहे . बघूया . आणि याचे उत्तर आधी भाजपने दिले पाहिजे . आमच्याकडे संख्या कमी आहे.
नेमके काय म्हणाले शरद पवार….
- सोनिया गांधी यांच्याबरोबरची चर्चा फक्त राजकीय परिस्थितीबद्दल, शिवसेनेबरोबर जाण्यासंबंधी चर्चा नाही
- राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमाची चर्चा नाही
- राज्यातल्या विधीमंडळातल्या नेत्यांची जी चर्चा झाली, ती किमान समान कार्यक्रमाविषयी नाही
- आम्ही फक्त राजकीय सद्यस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत
- आमचा फक्त ५४ आमदारांचा पक्ष आहे, आम्ही कशी सत्ता स्थापन करणार
- संजय राऊत काय बोलतात ते मी कसं सांगणार, त्यांना विचार
- कोणाबरोबर जायचं, नाही जायचं हे अजून निश्चित नाही. आमच्याकडे अजून 6 महिन्यांचा वेळ आहे
- कुठलाही निर्णय किंवा चर्चेआधी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप अशा मित्रपक्षांबरोबर चर्चा आवश्य
- सध्या फक्त राष्ट्रवादीबद्दल बोलणार. शिवसेनेविषयी नाही
- भाजपबरोबर जाणार नाही हे निश्चित का, यावर पवार म्हणाले आम्ही निवडणूक त्यांच्याविरोधात लढलो.
बैठकीत महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. या सगळ्या घटनांवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. दोन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांची मत जाणून घेत चर्चा करणार आणि मग निर्णय घेणार. यामध्ये राजू, शेट्टी, जोगेंद्र कवाडे , पिझन्ट पार्टी , समाजवादी पार्टीला विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
संजय राऊत म्हणाले , मुख्यमंत्री शिवसेनेचाच !!
शिवसेनेबरोबर सरकारस्थापनेबद्दल अजून आमची चर्चाच झालेली नाही, असं शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याबरोबरच्या भेटीनंतर सांगितलं आणि सरकारस्थापनेविषयीचा संभ्रम आणखी वाढला. शरद पवार – सोनिया गांधी भेटीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. त्याबद्दल विचारलं असता संजय राऊत यांनी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पवार यांच्याकडे गेलो होतो, असं सांगितलं. सरकार स्थापनेबद्दल काँग्रेस -राष्ट्रवादीने अद्याप काहीच भूमिका जाहीर केलेली नाही, याबद्दल विचारलं असता, राऊत यांनी थेट प्रतिक्रिया द्यायचं टाळलं. “शरद पवार यासंदर्भात काही बोलले असतील, तर त्यांना कसं काउंटर करायचं”, असं ते म्हणाले. शिवसेनेचाच मुख्यमंत्री हे मात्र त्यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितलं. पवार यांनी सोनियांशी शिवसेनेविषयी चर्चा केली नसेल तरी मी त्यांना कसा प्रश्न विचारू? असं ते म्हणाले.