सत्तापेच सोडवण्यासाठी सोनिया गांधींची शरद पवारांशी चर्चा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फोनवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आज सकाळी चर्चा केली. तसेच पुढील चर्चेसाठी अहमद पटेल, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणुगोपाळ हे तिघेही शरद पवार यांना भेटण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत.
राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. भारतीय जनता पक्षाने ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. तर शिवसेनेने पुन्हा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो यावर सगळी गणितं अवलंबून असल्याने आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे. आज सकाळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर पुढील चर्चेसाठी ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणुगोपाळ यांना मुंबईला पाठवण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती स्वतः वेणुगोपाळ यांनी ट्विटरवरून दिली. ‘पटेल, खरगे आणि मी मुंबईला जाणार असून, शरद पवारांची भेट घेऊन पुढील चर्चा करणार आहोत,’ असंही वेणुगोपाळ यांनी सांगितलं. आता काँग्रेस काय भूमिका घेणार? सत्तापेच सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
तत्पूर्वी, सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे. काँग्रेससोबत आज कुठलीही बैठक होणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. तर सत्तास्थापनेची आमची तयारी आहे, पण काँग्रेसचाच निर्णय झालेला नसल्याचे. सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारा यांनी काँग्रेस नेतृत्वावर दिरंगाईचे खापर फोडले आहे. तसेच जो काही निर्णय होईल तो एकत्रितच घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता काँग्रेसचे दिल्लीतील नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यात नक्की कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. ही भेट होणार का? किंवा काँग्रेस काय भूमिका घेणार आहे, हे या भेटीनंतरच स्पष्ट होणार.