Ayoddhya Verdict : पंतप्रधान मोदी , देवेंद्र फडणवीस यांचे शांततेचे आवाहन , देशभर कडेकोट बंदोबस्त

अयोध्या पर सुप्रीम कोर्ट का जो भी फैसला आएगा, वो किसी की हार-जीत नहीं होगा। देशवासियों से मेरी अपील है कि हम सब की यह प्राथमिकता रहे कि ये फैसला भारत की शांति, एकता और सद्भावना की महान परंपरा को और बल दे।
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2019
सर्वोच्च न्यायालय उद्या अयोध्येचा निकाल येणार आहे. या निकालाकडे जय-पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका. निकाल काहीही येवो. देशातील नागरिकांनी शांतता, एकता आणि सद्भावना कायम राखावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना केलं. दरम्यान राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.
या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. उत्तर प्रदेशसह देशातील सर्व राज्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ट्विट करत देशातील जनतेला शांतता कायम राखण्याचं आवाहन केलं आहे.
‘गेल्या काही महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर निरंतर सुनावणी होत होती. या काळात समाजातील सर्व वर्गांकडून सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही चांगली गोष्ट होती. कोर्टाच्या निर्णयानंतरही आपल्याला शांतता कायम राखायची आहे. उद्या कोर्टाकडून दिला जाणारा निर्णय म्हणजे जय-पराजय नाही. शांती, सद्भावना आणि एकता कायम राखणं ही आपल्या देशाची महान परंपरा आहे. या परंपरेला आणखी बळ द्या,’ असं ट्विट मोदींनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचेही आवाहन
दरम्यान, अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील जनतेला शांतता आणि संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमी विवादाचा निकाल उद्या अपेक्षित असून, या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखण्यास मदत करावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
या प्रकरणातील सर्व बाजू आणि सर्व पक्षांना ऐकल्यानंतरच आता हा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या निकालानंतर समाजामध्ये सलोखा राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशाच प्रकारे आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि संयम राखून कायदा-सुव्यवस्था राखण्यास योगदान द्यावे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. राज्य सरकार सर्व यंत्रणांच्या संपर्कात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.