रजनीकांत यांचा मोठा खुलासा , मला भाजपच्या भगव्या रंगात रंगविण्याचा प्रयत्न , मी जाळ्यात अडकणार नाही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक कामांची प्रशंसा करणारे दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांनी भाजपकडून मला भगवा रंग देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपने तमिळ कवी आणि ज्येष्ठ विचारवंत थिरुवल्लावर यांच्या बाबतीतही हेच केलं. पण आम्ही दोघेही भाजपच्या जाळ्यात अडकणार नाही, असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान आपल्याला भाजपकडून पक्षात येण्याची कोणतीही ऑफर नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अभिनेते रजनीकांत यांनी अनेकवेळा काही मुद्यांवर पंतप्रधानांचे कौतुक केल्यामुळे त्यांची भाजपशी जवळीक असल्याचे बोलले जात होते परंतु आता जाहीरपणे आपण भाजपच्या जाळ्यात अडकणार नसल्याचे स्पष्ट केल्याने भाजपाची गोची झाली आहे. तामिळनाडूमध्ये थिरुवल्लावर यांच्या विचारांना आदराचं स्थान आहे. पण थिरुवल्लावर यांच्या बाबतीत भाजप राजकारण करत असल्याचा आरोप तामिळनाडूतील स्थानिक पक्ष करत आहेत.
दरम्यान थिरुवल्लावर यांच्या पुतळ्याला तामिळनाडू भाजपकडून भगवी वस्त्र परिधान करण्यात आल्यानंतर याला मोठ्या प्रमाणात विरोध सुरु झाला. भाजप संतांनाही राजकारणात आणत असल्याचा आरोप डाव्या पक्षांसह डीएमकेनेही केला आहे . थिरुवल्लावर यांचा जन्म मैलापूरमध्ये झाला. थिरुवल्लावर हे दोन हजार वर्षांपूर्वी तामिळनाडूचे प्रसिद्ध कवी होऊन गेले. त्यांनी १३३० पानांचं प्रसिद्ध थिरुक्कुराल हे धर्मनितीशास्त्र लिहिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच थायलंड दौऱ्यात तमिळ भाषेतील या धर्मनितीशास्त्राचं थाय भाषेत प्रकाशन केले आहे.