Aurangabad : कर्जबाजारी युवकाची विष प्राशन करून आत्महत्या, हिमायत बागेतील घटना

औरंंंगाबाद : नवीन पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी अनेकांकडून कर्ज घेतलेल्या २३ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि.५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास हिमायतबाग परिसरात उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. रिहान खाँन जाँबाज खाँन (वय २३, रा.औरंगाबाद टाईम्स कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असल्याचे बेगमपुरा पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिहान खॉन हा उच्चशिक्षीत तरूण होता. तो शहरातील एका खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करीत होता. रिहान खॉन याला स्वतःची पॅथॉलॉजी लॅब सुरू करायची असल्याने त्याने अनेकांकडून पैसे घेतले होते. जवळपास ५० लाख रूपयांचे कर्ज रिहान खॉन याच्यावर झाले होते, तरी त्याची लॅब सुरू न झाल्याने अनेकांनी त्याच्याकडे पैसे परत मागण्यास सुरूवात केली होती. सोमवारी सकाळी घराबाहेर पडलेला रिहान खॉन हा दुपारी घरी परत आला होता. घरी काही काळ थांबल्यानंतर रिहान खान हा घराबाहेर पडला होता, सायंकाळनंतर त्याचा मोबाईल फोनही लागत नव्हता अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
दरम्यान, मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हिमायतबागेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरीकांना एका झाडाखाली एक तरूण बेशुध्दावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. तसेच जवळच दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईडब्ल्यू-७११४) उभी होती. मॉर्निक वॉकसाठी गेलेल्या नागरीकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बेशुध्दावस्थेतील युवकास उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे