Air Strike & Pakistan : हवाई हल्ल्याचा इन्कार आणि भारताला पुन्हा धमकी

भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने एकीकडे भारताने पाकिस्तानात घुसून कारवाई केलीच नसल्याचा दावा केला, तर दुसरीकडे वेळ आणि जागा निवडून प्रतिहल्ल्याचा इशाराही दिला. भारताने पाकिस्तान सीमेचे उल्लंघन केल्याचे मात्र पाकने मान्य केले आहे. संयुक्त राष्ट्रे आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा मुद्दा उचलून धरणार असल्याचेही पाकने म्हटले आहे. पाकिस्तानने आज, बुधवारी संसदेचे संयुक्त सत्र बोलावले आहे. त्याचबरोबर ‘नॅशनल कमांड ऑथॉरिटी’ची बैठकही होणार आहे.
भारताने दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने तातडीने राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला प्रशासकीय आणि लष्करातील उच्च अधिकारी उपस्थित होते. लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हेदेखील बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान इम्रान खान यांनी येणाऱ्या सर्व धोक्यांसाठी देशवासीयांना सज्ज राहण्यास सांगितले आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा प्रांतातील बालाकोट येथील जैश-ए-महंमद दहशतवादी संघटनेचा दहशतवादी तळ भारताने हवाई हल्ला करून उद्ध्वस्त केला. यामध्ये ३५०हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक, कमांडर यांचा समावेश आहे.
दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ‘बालाकोट येथील कथित दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा आणि मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा भारताने केलेला दावा समिती तीव्र शब्दांत अमान्य करीत आहे. भारताने पुन्हा एकदा काल्पनिक दावा करण्यातच धन्यता मानली आहे.’ समितीने असे म्हणतानाच पुढे म्हटले आहे, की ‘भारताने अनावश्यक आक्रमकता दाखवली आहे. पाकिस्तान त्याला अवश्य प्रत्युत्तर देईल. वेळ आणि जागा त्यासाठी पाकिस्तान निवडेल.’ समितीने जगभरातील प्रसारमाध्यमांनादेखील घटनास्थळाला भेट देण्यासाठी आमंत्रित केले आहे. सूत्रांचा दाखला देऊन एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे, की पाकिस्तान हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांत आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मांडणार आहे. तसेच, हा मुद्दा इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) व्यासपीठावरदेखील मांडणार आहे. भारताने ही कृती निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे केलेली असून त्यामुळे प्रादेशिक शांतता आणि स्थिरता धोक्यात आली आहे.