कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा हल्ला , ५ मजूर ठार , एक गंभीर

कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. दहशतवादी हल्ल्यात ठार झालेले सर्व मजूर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील आहेत. जखमी मजुरावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. युरोपीय संघाचं २७ सदस्यीय शिष्टमंडळ जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असतानाच हा दहशतवादी हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.
मजुरांवरील हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून सुरक्षादलाच्या अतिरिक्त तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे. अनंतनागमध्ये युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अन्य राज्यांतून येणारे ट्रकचालक, व्यापारी, मजूर यांना लक्ष्य करण्यात येत आहे. याआधीही एका मजुराची हत्या करण्यात आली होती. गेल्या १५ दिवसांत दहशतवाद्यांनी ४ ट्रकचालक आणि एका सफरचंद व्यापाऱ्याचीही हत्या केली आहे.
काल सोमवारी अनंतनागमध्ये नारायण दत्त या ट्रकचालकाची हत्या करण्यात आली होती. सोपोरमध्ये कालच एका बसस्टॉपवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. त्यात २० नागरिक जखमी झाले होते. त्यातील एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.