इकबाल मिर्ची कनेक्शन , राज कुंद्रा यांनाही ईडीचे बोलावणे

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती व उद्योजक राज कुंद्रा यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा ‘राइट हँड’ इक्बाल मिर्चीच्या मालमत्तांचा सौदा करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या रणजीतसिंग बिंद्रा याच्यासोबत कनेक्शन असल्याच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे. त्यामुळे राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राज कुंद्रा यांना ईडीने बजावलेल्या समन्सनुसार ४ नोव्हेंबर रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहायचे आहे. ईडीच्या मुंबईतील कार्यालयात राज कुंद्रा यांची चौकशी केली जाणार आहे.
इक्बाल मिर्चीच्या २२५ कोटी रुपये किंमतीच्या बेहिशेबी संपत्तीचा सौदा केल्याप्रकरणी रणजीतसिंग बिंद्राला अटक करण्यात आलेली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, बिंद्राची रीयल इस्टेट कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स आणि इसेन्शियल हॉस्पिटॅलिटी या कंपन्यांमध्ये व्यवहार झाल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. इसेन्शियल हॉस्पिटॅलिटी ही राज कुंद्रा यांची कंपनी असून शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक आहेत. बिंद्राच्या कंपनीने कुंद्रा यांच्या कंपनीत ४४.११ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तसेच शिल्पा व राज कुंद्रा यांच्या कंपनीला एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात ३०.४५ कोटी रुपये तर एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या काळात ११७.१७ कोटी रुपयांचे कर्जही या कंपनीकडून मिळाले आहे. ईडी याप्रकरणी राज कुंद्रा यांची चौकशी करणार आहे.
इक्बाल मिर्ची कनेक्शनवरून ईडीने याआधी माजी केंद्री मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचीही चौकशी केली आहे. दरम्यान, मिर्ची कनेक्शन प्रकरणी रणजीतसिंग बिंद्रासह मिर्चीचा जवळचा साथीदार हारून युसुफ मनी लाँडरिंग प्रकरणी अटकेत असून दोघेही सध्या ईडीच्या कोठडीत आहेत.
इक्बाल मिर्ची हयात नसून त्याच्या नावाने असलेलं मालमत्तांचं घबाड उघड झालं आहे. भारतासह संयुक्त अरब अमिराती तसेच ब्रिटनमध्येही इक्बालच्या नावाने बेहिशेबी मालमत्ता असल्याचे पुरावेही ईडीच्या हाती आले आहेत. मिर्चीचा २०१३ मध्ये ६३ व्या लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. एप्रिल २०१६ मध्ये पनामा पेपर्स प्रकरणातही मिर्चीचं नाव पुढे आलं होतं.