Pakistan : रात्रीच्या अंधारामुळे आम्ही उत्तर देऊ शकलो नाही : पाकचे संरक्षण मंत्री

जैश ए मोहम्मदच्या तळांवर भारतीय वायुदलाने पाकव्याप्त भागांमध्ये घुसून एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेज खटक यांनी या हल्ल्याबाबत म्हटले आहे की, भारतीय वायुदलाने हल्ला केला तेव्हा प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हीही सज्ज झालो होतो पण रात्रीचा काळोख होता त्यामुळे आम्ही उत्तर देऊ शकलो नाही.
पत्रकार नायला इनायत यांनी यासंदर्भातला एक व्हिडिओ ट्विट केला आहे. परवेज खटक यांनी हवाई हल्ला झाल्याचे मान्य केले असून प्रत्युत्तर देणार होतो पण काळोख होता, त्यामुळे काय नुकसान झाले याचा अंदाज येऊ शकला नाही असेही खटक यांनी म्हटले आहे . एवढेच नव्हे तर हल्ला झाल्यानंतर किती आणि काय नुकसान झालंय याचा अंदाज वायुदलाने घेतला. भारताने पुन्हा अशी कारवाई केली तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ असंही खटक यांनी म्हटलं आहे. तर त्यांच्या शेजारी बसलेले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी म्हटले की भारताने जेव्हा हवाई हल्ला केला तेव्हा पाकच्या लढाऊ विमानांनी आकाशात भरारी घेतली होती, हे पाहून भारतीय विमाने परतली.
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. भारतीय वायुदलाच्या मिराज 2000 च्या ताफ्याने बालाकोट परिसरात असलेल्या जैश ए मोहम्मदच्या तळांवर बॉम्बफेक केली. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदची मोठी हानी झाली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर शस्त्रास्त्रांचा अगणित साठा होता. मात्र, भारतीय वायूदलाच्या हल्ल्यात हा शस्त्रांचा साठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. यामध्ये २०० एके सीरीजच्या रायफल्स, अगणित काडतुसे, ग्रेनेड, स्फोटके आणि डिटोनेटर अशा साधनांचा समावेश होता. या हल्ल्यात मसूद अजहरचा मेव्हणा आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख नेता मौलाना युसूफ अजहर याच्यासह 200 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जैश-ए-मोहम्मदला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.