इंडियन इंजिनिअरिंग सव्र्हिसेसच्या (आयईएस) परीक्षेत मंगळवेढय़ाचा हर्षल भोसले देशात प्रथम

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरिंग सव्र्हिसेसच्या (आयईएस) परीक्षेत सोलापूर जिल्ह्य़ातील मंगळवेढय़ाचा हर्षल ज्ञानेश्वर भोसले यांने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात हे धवल यश मिळविले. लहानपणीच वयाच्या पाचव्या वर्षीच वडिलांचे छत्र हिरावले गेलेल्या हर्षलने गरिबीचे चटके सहन करीत गाजविलेल्या कर्तत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे गेल्या जानेवारीत इंडियन इंजिनिअरिंग सव्र्हिसेसची (आयईएस) परीक्षा घेतली होती. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये मुलाखती घेण्यात आल्या असता त्यात मंगळवेढय़ाच्या हर्षल भोसले याने देशात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. या परीक्षेंतर्गत ५११ जागा रिक्त होत्या. यात स्थापत्य अभियांत्रिकीच्या १६१, यंत्र अभियांत्रिकीच्या १३६, विद्युत अभियांत्रिकीच्या १०८ व अणुविद्युत आणि दूरसंचार अभियांत्रिकीच्या १०६ जागांचा समावेश होता.
हर्षल हा पाच वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर आईने शेतीमध्ये काबाडकष्ट करून हर्षलचे शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण मंगळवेढय़ाच्या इंग्लिश स्कूल व देगावच्या आश्रमशाळेत पूर्ण झाले् होते. तर बीड येथील शासकीय तंत्रनिकेतनमधूुन अभियांत्रिकी पदविका संपादन केल्यानंतर कराड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल पदवी घेतली. त्याला मुंबईत भाभा अणुसंधान संशोधन संस्थेत नोकरी मिळाली होती. परंतु त्याने पुढचे ध्येय गाठले होते. पुण्यात ऑईल अॅनन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये सेवेत असतानाच त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षा दिली.
हर्षल भोसले हा मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील राहणारा आहे. मंगळवेढय़ात सुरूवातीला शालेय शिक्षण घेत असताना त्याने अभ्यासाकडे लक्ष दिले नव्हते. तो इतरांप्रमाणे सामान्य विद्यार्थी गणला जायचा. शालेय शिक्षण अर्धवट सोडून देत त्याने एक वर्ष घरीच राहणे पसंत केले होते. नंतर त्याच्या मनाने पुन्हा उचल खाल्ली आणि ध्येय उराशी बाळगून पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी त्याने सोलापूरजवळील देगाव येथील माध्यमिक आश्रमशाळेत प्रवेश घेतला आणि चिकाटीने अभ्यास करून पुढची वाटचाल धरली. अखेर त्याचे स्वप्न साकार झाले. त्याची आई अशिक्षित आहे. ती शेतात राबते. आपला मुलगा परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला, एवढीच तिला माहीत आहे. वडिलांना दारूचे व्यसन होते. दारूच्या आहारी गेल्यानेच त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा हर्षल केवळ पाच वर्षांचा होता.