NIA : फुटीरतावादी नेत्यांच्या घरांवर छापे : दोन दिवस काश्मीर बंदचे आवाहन

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये मंगळवारी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अनेक ठिकाणी टेरर फंडिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये सात ठिकाणी छापे मारले. यात अनेक फुटीरतावदी नेत्यांच्या घरांचाही समावेश आहे. तेथून बँकांची कागदपत्रे तसेच पाकिस्तानी व्हिसासाठी केलेली शिफारसपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. फुटीरतावादी नेते यासीन मलिक शब्बीर शाह, मीरवाइज उमर फारुख, अशरफ खान, मसरत आलम, जफ्फार अकबर आणि नसीम गिलानी यांच्या घरांवर हे छापे टाकण्यात आले . या छाप्यात अनेक मालमत्तांची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांच्या पावत्या, बँक खात्यांचे तपशील,, विविध दहशतवादी संघटनांचे लेटरहेड आणि पाकिस्तानी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी व्हिसा देण्यासाठी शिफारस पत्र अशी अनेक प्रकारची कागदपत्रे या छाप्यांमध्ये एनआयएच्या हाती लागली आहेत. या व्यतिरिक्त फुटीरतावादी नेता मीरवाइज उमर फारुखच्या घरातून हायस्पीड इंटरनेट कम्युनिकेशन सेटअपदेखील जप्त करण्यात आला.
या छापेमारीचा निषेध म्हणून फुटीरतावाद्यांनी दोन दिवस काश्मीर बंदचे आवाहन केले आहे. एनआयएचं धाडसत्र आणि कलम ३५-अ बदलण्यातील धोक्याविरोधात बुधवार आणि गुरुवारी काश्मीर बंदचं आवाहन जॉइंट रेझिस्टन्स लीडरशीपने केलं आहे. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांसह थेट घरात घुसून सर्व घर उलटपालट केलं आणि कुटुंबीयांनाही घाबरवलं असा आरोप केला आहे.