आर्थिक मंदीमुळे दिवाळीच्या खरेदी -विक्रीतही मोठी मंदी , पावसामुळे फुलांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम

राज्यातील पावसाळी वातावरण आणि आर्थिक मंदी या दोन्हीही कारणांमुळे शहरात ग्राहकांमध्ये काहीसे निरुत्साही वातावरण आहे. मुंबईत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत यंदा घट झाली आहे. धनत्रयोदशीला देखील २३ किंवा २४ कॅरेट शुद्धतेच्या नाण्याच्या खरेदीसाठी ग्राहक फारसे उत्सुक नसल्याचे दिसले. मुंबईत दरवर्षी धनत्रयोदशीसारख्या मुहूर्ताला सराफा बाजारात साधारण ७०० किलो उलाढाल होते. मात्र, यंदा ५०० किलोपर्यंत खरेदी-विक्री झाली आहे.
दिवाळीत फुलांना मोठी मागणी असते. मात्र, या दिवाळीत फुलांना अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नसल्याने फुल उत्पादन करणारे शेतकरीही नाराज आहेत. राज्यात सर्वदूर परतीचा पाऊस झाल्याने झेंडूसह शेवंतीच्या फुलांचा भिजलेला माल बाजारपेठेत आला आहे. मात्र, फुलांना मागणी असली तरी भिजलेला माल असल्याने त्याला दर कमी मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्याबाहेर माल पाठविणेही या कारणामुळे शक्य झाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला. दरम्यान फुलांचा दर्जा घसरल्याने काही ठिकाणी रस्त्यावर फुले फेकून द्यावी लागल्याचे चित्र दिसत आहे. औरंगाबादमध्ये मात्र ३० ते ४० रुपये दराने फुलांची विक्री होतं दिसत आहे.
दिवाळीच्या सणानिमित्त फटाक्यांची बाजारपेठ सज्ज झाली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेने फटाक्यांच्या विक्रीलाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. आठवड्यापासून सातत्याने पाऊस हजेरी लावत असल्यामुळे त्याचा परिणाम फटाके विक्रीवरसुद्धा झाला आहे. मातीच्या स्वस्त पणत्यांना मात्र मोठी मागणी आहे.