व्हायरल रावसाहेब दानवे : “मी असेपर्यंत खुशाल गायी कापा ” दानवेंचे मात्र डोळ्यावर आणि कानावर हात , ” मी असे म्हटलोच नाही ….

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे कधी आणि कुठल्या व्हायरल वक्तव्यामुळे व्हायरल होतील सांगता येत नाही . आता त्यांचा ” मी असेपर्यंत खुशाल गायी कापा..” असे म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे मात्र आपण असे काही म्हणालोच नाही म्हणून त्यांनी कानावर आणि डोळ्यावरही हात ठेवले आहेत.
रावसाहेब दानवे यांचे एका प्रचारसभेतले हे भाषण आहे. या भाषणात “मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा ” असे वक्तव्य करताना ते दिसत आहेत. केंद्र सरकारने गोहत्या बंदीचा कायद्याची देशभरात अंमलबजावणी केली. मात्र त्यांच्याच सरकारमधले मंत्री आता हे वक्तव्य करत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात प्रचार करताना ते असं बोलले असल्याचे दिसत आहे. हि व्हिडीओ क्लीपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अधून मधून दानवे कुठल्या न कुठल्या मुद्दयांवर व्हायरल होत असतात. मागेही त्यांचे तुरी आणि शेतकऱ्यांवरून केलेले वक्तव्य चांगलेच गाजले होते.
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी अशाप्रकारचे कोणतेही वक्तव्य केलेले नाही असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे त्यासोबत कोणीतरी छेडछाड केली असावी असंही त्यांनी स्पष्ट केलं. १९ ऑक्टोबर रोजी रावसाहेब दानवे यांनी कठोरा बाजार या ठिकाणी मुस्लिम बांधवांची सभा घेतली. या सभेत रावसाहेब दानवे यांनी जे वक्तव्य केलं त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या भाषणात रावसाहेब दानवे म्हणतात ” केंद्र सरकारने गोहत्या बंदी लागू केली तेव्हा यांच्यापैकी काही लोक माझ्याकडे आले. बकरी ईद आली आहे साहेब आता कसं करायचं? मी म्हटलं काय झालं? तर ते म्हणाले अहो ते गोहत्या बंदी आहे ना, मी त्यांना म्हटलं मी असेपर्यंत खुशाल गायी कापा” हे वक्तव्य असलेलं त्यांचं भाषण व्हायरल झालं आहे. एवढंच नाही तर आपल्या तालुक्यात दोन नंबरचे धंदे सुरु आहेत तुम्ही म्हणत असाल तर दोन मिनिटात ते बंद करतो असंही रावसाहेब दानवे म्हणालेले आहेत.