पुलवामा : घरात दबा धरून बसलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

#WATCH Jammu and Kashmir: 3 terrorists killed in encounter between security forces & terrorists in Awantipora today. Arms & ammunition recovered. Identities and affiliations being ascertained. Search in the area continues. pic.twitter.com/xMWn0Vl9Fl
— ANI (@ANI) October 22, 2019
बहुचर्चित पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. पुलवामामध्ये अवंतीपुरातील राजपुरा गावात ही चकमक झाली. चकमकीत ठार झालेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतावीद संघटनेत सक्रिय होते. त्यातील दोन जण पाकिस्तानी नागरिक वृत्त आहे.
जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या अवंतीपुरामध्ये दहशतवादी सक्रिय असून त्यांनी एका घरामध्ये आश्रय घेतल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज दुपारी युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेण्यात आली. राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि एसओजीच्या पथकांनी संयुक्तपणे या कारवाईत भाग घेतला. संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली. राजपुरा गावात जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. त्यामुळे सापळ्यात अडकलेल्या दहशतवाद्यांनी नाकाबंदी भेदून निसटण्याचा बेत आखला होता मात्र सुरक्षा दलांनी त्यांना यशस्वी होऊ दिलं नाही.
लष्कराला मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी एका घरात दबा धरून बसले होते. त्या ठिकाणाला राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी चारही बाजूंनी घेरताच दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. चार तासांच्या चकमकीनंतर तीनही दहशतवाद्यांना टिपून ठार मारण्यात जवानांना यश आलं. या कारवाईनंतर घटनास्थळी झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व स्फोटकं आढळून आली आहेत.
दरम्यान भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईचा एक व्हिडिओही समोर आला आहे. १ मिनिट ५४ सेकंदांचा हा व्हिडिओ असून यात दोन्ही बाजूने होत असलेला बेछूट गोळीबार स्पष्टपणे दिसत आहे. ज्या घरात दहशतवादी दबा धरून बसले होते. तिथून गोळीबार करण्यात येत होता. त्याला चारही बाजूने घेरण्यात आले व नंतर दहशतवाद्यांना टिपण्यात आले. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.